…तर मग महिला सुरक्षित आहे तरी कुठे?

दिल्ली वार्ता

 वंदना बर्वे

मंदीर आणि मशिदीत मुलगी सुरक्षित नव्हतीच; पण लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरातही महिला सुरक्षित नाही, हे ऐकून मोठा धक्का बसला. अध्रया देशाच्या पायाखालची जमीन सरकली असेल. काश्‍मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामाख्यापर्यंत महिला कुठेही सुरक्षित नाही. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही एक स्त्री तिच्याच देशात सुरक्षित नाही. मग महिला सुरक्षित आहे तरी कुठे?

माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी “कास्टींग काऊच’बाबत केलेल्या विधानानंतर अर्धा भारत स्तब्ध झाला आहे. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात “कास्टींग काऊच’च्या घटना सर्रास घडत आहेत.महिलांचे शोषण फक्त बॉलिवूडमध्ये होते असे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिलांना या प्रकाराचा सामना करावा लागतो. देशाची संसदही यास अपवाद नाही, असे चौधरी म्हणाल्या आहेत.

चौधरी या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सदस्य म्हणून खूप मोठा काळ राजकारणात घालविला आहे. आणि सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. “बॉलिवूडच काय तर संसदही “अशा’ घटनांना अपवाद नाही’, असे त्या म्हणत असतील तर सावध, सतर्क आणि सक्रीय होण्याची गरज आहे.

जम्मूच्या कठुआतील एका मंदिरात एका चिमुकलीवर सतत सात दिवस सामूहिक अत्याचार केला जातो. एक मशिदीत मौलवी एका छकुलीवर अत्याचार करतो. अत्याचाराची श्रृंखला अख्ख्या देशात तयार झाली आहे. एक मुलगी, एक महिला आपल्याच घरात, आपल्याच गावात आणि आपल्याच देशात सुरक्षित नसेल तर मग एका स्त्रिने जायचे तरी कुठे, याचे उत्तर सरकार आणि समाजाला द्यावे लागेल.

दुर्दैवाची बाब म्हणजे, जम्मू आणि यूपीसारख्या घटनांवर दिवसभर “टीव-टीव’ करणारा ठेकेदार समाज रेणुका चैधरी यांच्या विधानानंतर थेट “कोमा’त गेला. कुणीही निषेध नोंदविला नाही, निर्भत्सना केली नाही, आक्षेप घेतला नाही किंवा कुणी सुधारणेचा विडा उचलला नाही. समाजाच्या या भूमिकेवर रडावे की हसावे? प्रख्यात कोरियोग्राफर सरोज खान यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात “कास्टींग काऊच’वर विधान केले. “कास्टींग काऊच’ हा प्रकार नवीन नाही. प्रत्येक मुलीला या प्रकारास सामोरे जावे लागते. मग क्षेत्र कोणतेही असो. बॉलिवूडमध्ये किमान मुलीला वाऱ्यावर सोडून दिले जात नाही. तिला काम दिले जाते. हा प्रकार प्रत्येक क्षेत्रात आहे.

तरीसुध्दा मिडीया फक्त बॉलिवूडच्या मागे लागलेला असतो’, असे सरोज खान म्हणाल्या. आणि देशात प्रतिक्रियांचा महापूर आला. यानंतर सरोज खान यांनी क्षमा सुध्दा मागितली.सरोज खान यांच्यानंतर रेणुका चौधरी यांनी या मुद्यावर तोंड उघडले. पण राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात रमणाऱ्या समाज सुधारकांना आपले तोंड उघडावेसे नाही वाटले. देशात अत्याचाराच्या घटना सर्रास घडत असताना समाज सुधारकांनी मौन पाळणे खरेच दुर्दैवी आहे.

एक मात्र नक्की की, राजकारणातही “कास्टींग काऊच’ची घाण बऱ्यापैकी पसरली आहे. रेणुका चौधरी यांनी यापूर्वीसुध्दा या विषयाला वाचा फोडली होती. मुळात, “कास्टींग काऊच’ची घाण सर्वच क्षेत्रात पसरली आहे, हे खरे आहे. विशेषतः चित्रपटसृष्टीत. दक्षिण भारतातील तेलगू अभिनेत्री श्रीरेड्डी हिने अलिकडेच या प्रकाराच्या विरोधात आंदोलन केले होते. सरोज खान यांच्या विधानाबाबत श्रीरेड्डी म्हणाली की, “मॅडम मी आपला खूप आदर करते. एक मोठ्या पर्सनलिटी आणि ज्येष्ठ असल्यामुळे आपण आताच्या नट्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा होता.

नट्यांनी निर्मात्यांची गुलामी करावी, या आपल्या शब्दांतून चुकीचा संदेश पसरला आहे.’ तेलगू चित्रपटातील या अभिनेत्री अलिकडेच “कास्टींग काऊच’च्या विरोधात भर रस्त्यात अर्धनग्न झाली होती.एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या आरोपात जोधपूर न्यायालयाने आसाराम बापूला आयुष्यभरासाठी खडी फोडायला तुरूंगात पाठविले. तो कोट्यवधी भाविकांच्या श्रध्दास्थानी होता. भाविक त्याची पुजा करायचे. मात्र, तो लांडगा निघाला.

मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने तर राज्यातील पाच संतांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा नुकताच दर्जा दिला. संतांनी तो स्वीकारलासुध्दा. माया-मोहापासून लांब राहण्याचा सल्ला देणाया संतांनाच “लाल दिव्या’चा मोह टाळता आला नाही.

मुख्यमंत्री चौहान यांनी नर्मदा यात्रा काढली होती. ही यात्रा खूप यशस्वी झाली आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुकही झाले. परंतु, याच मुख्यमंत्र्यांनी खूप मोठा घोटाळा केला असल्याचा याच पाच संतांचा आरोप होता. चौहान यांनी सहा कोटी झाडे लावण्यात आली असल्याचे सांगितले. यावर कोट्यवधीचा खर्च झाला. मुळात, सहा कोटी झाडे लावली गेलीच नाहीत, असा या पाच बाबांचा आरोप होता.

मुख्यमंत्र्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी भैय्यूजी महाराज यांच्यासह पाच बाबांनी 45 दिवस राज्याटन करण्याचा निर्णय घेतला. या काळात सरकारचा पर्दाफाश करण्याचा आणि सहा कोटी झाडे लागलीच नाहीत, हे लोकांना सांगण्यालचा त्यांचा मानस होता. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली होती.

चौहान यांनी निवडणुकीच्या तोंडावर परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पाचही बाबांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. आणि “दक्षिणा’ मिळताच या बाबांनी “नर्मदा घोटाळा यात्रा’ स्थगित केली. तसेच नर्मदेचा परिसर हिरवागार करण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

मध्यप्रदेशात कॉंग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. चौहान सरकारचा पर्दाफाश करणार, म्हणून जे बाबांचे कौतुक करीत होते, आता तेच कॉंग्रेसी टिका करत आहेत. राज्यमंत्र्याचा दर्जा स्वीकारून बाबांनी स्वतःचा अपमान करून घेतला. आपल्या देशात संत पुजनीय आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीसुध्दा संतांचे चरण स्पर्श करण्यासाठी तयार असतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत कबीर यांनी अशा संतावर कठोर शब्दात केली आहे. राष्ट्रसंतांच्या मते, भगवे वस्त्र घातल्याने, टीळा लावल्याने, वस्त्रांचा त्याग केल्याने किंवा दाढी-मिशी वाढवल्याने कुणी संत होत नाही. जंगली कुत्र्याच्या अंगावर भगवे पट्टे असतात. पारधी निव्वळ लंगोटीवर राहतो. म्हणून त्यांना कुणी साधू म्हणत नाही. संत कबीरांनी सुध्दा खोट्या साधूंवर प्रहार केला आहे. ते म्हणतात,

मन ना रंगाये, रंगाये जोगी कपडा
दाढी-मुंछ मुंडायो, जोगी हो गयो हिजरा
मन ना रंगाये, रंगाये जोगी कपडा
दाढी मूंछ बढायो, जोगी हो गयो बकरा!

आसाराम बापूच्या प्रकरणापासून लोकांनी धडा घेण्याची गरज आहे. मुली आणि महिलांनी सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. परंतु, आई-वडिलांनी डोळ्यात तेल ओतून सावध राहण्याची गरज आहे. आसारामसारख्या बाबाच्या जाळ्यात मुली अडकणार नाही, याची काळजी पालकांनीच घ्यायला पाहिजे. कारण, आश्रमात जाण्याचा आग्रह आई-वडीलच जास्त करतात. त्यात मुलींना फारसा रस नसतो.

परंतु, आई-वडिलांच्या दबावासमोर नाईलाज नसल्यामुळे मुली अशा भामट्यांच्या आश्रमात जातात. प्रवचन ऐकायला गेले की चांगले सासर मिळते. चांगली नोकरी मिळते. योग्य नवरा मिळतो अशी अफवा भामट्या साधुंकडून पसरविली जाते. आई-वडिलांना मोह सुटतो. या मोहाला बळी पडतात त्या मुली. म्हणून पालकांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे.

हरिद्वार येथील एका धार्मिक संघटनेने शंभरच्यावर भामट्या साधूंची यादी जाहीर केली आहे. मुली मंदीर आणि मशिदीत सुरक्षित नसतील तर भामट्या बाबांच्या आश्रमात कशा सुरक्षित राहतील? हा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांनी आधी स्वतःलाच विचारला पाहिजे!

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)