.. तर प्लॅस्टिक पिशवी पडेल 25 हजारांना!

सुनील राऊत

नागरिकांनादेखील महिनाभराची डेडलाइन


पिशव्या कचऱ्यात द्याव्याच लागणार


पिशवी वापरताना आढळल्यास 5 ते 25 हजारांचा दंड


महापालिका देणार आरोग्य निरीक्षकांना दंड आकारणीचे अधिकार

पुणे- राज्यशासनाने सरसकट लागू केलेल्या प्लॅस्टिक पिशवी आणि थर्मोकॉलच्या साहित्य वापराचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनादेखील लागू असणार आहे. त्यामुळे जर एखादा नागरिक सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिकची पिशवी वापरताना आढळल्यास त्याला 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. मात्र, या कारवाईची सुरूवात 25 एप्रिल 2018 पासून महापालिकेकडून सुरू केली जाणार आहे. या दंड वसुलीचे अधिकार घनकचरा विभाग आरोग्य निरीक्षक आणि सहायक आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार आहेत. कारवाई सुरू करण्यापूर्वी जनजागृती करूनच पुढील महिनाभरात घरातील प्लॅस्टिक पिशव्या संकलित केल्या जाणार आहेत.

प्लॅस्टिकबंदी आदेशाचा आधार घेत नागरिकांवर कारवाई करण्याचा कोणताही उद्देश महापालिकेचा नाही. मात्र, त्याची अंमलबजावणी आवश्‍यक आहे. शासन मुदतीनुसार, पहिल्या महिनाभरात प्रत्येक घरापर्यंत जाऊन सर्व प्लॅस्टिक पिशव्या तसेच थर्मोकॉल साहित्य जमा करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागस्तरावर या कचरा संकलनासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जमा झालेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावता येईल, यासाठीचे नियोजन सुरू आहे. कचरा संकलकांनाही याची सूचना देऊन नागरिकांपर्यंत माहिती पोहचविली जाईल.
– सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख.

प्लॅस्टिक बंदी आणि त्यासंबंधीच्या तरतुदींची माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी “प्रभात’शी बोलताना दिली. राज्यभरात दररोज तब्बल 1800 टन प्लॅस्टिक कचरा निर्मिती होते. याचे विघटन होण्यास तब्बल 500 वर्षे लागतात. त्यामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच हे प्लॅस्टिक एकदा वापरल्यानंतर त्याचा पुर्नवापर तसेच प्रक्रियेसाठीची यंत्रणा नसल्याने राज्यात घनकचऱ्याची समस्या गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यात प्लॅस्टिक आणि थर्मोकॉल बंदीची अधिसूचना काढली आहे. हा नियम फक्‍त उत्पादक आणि विक्रेत्यांनाच नाही, तर सामान्य नागरिकांनाही लागू असणार आहे. अनेक घरांत दैनंदिन वापरासाठी प्लॅस्टिक पिशव्या तसेच थर्मोकॉल साहित्य साठवलेले असते. प्रामुख्याने कचरा जमा करण्यासाठी या पिशव्या वापरल्या जातात. त्यामुळे या अधिसूचनेनुसार, नागरिकांनाही पुढील महिनाभराच्या आत या पिशव्या महापालिकेकडे जमा करणे बंधनकारक राहणार असल्याचे उपायुक्त जगताप यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास होणार कारवाई
प्लॅस्टिकबंदीच्या अधिसूचनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून प्लॅस्टिक पिशव्या वापरताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. मात्र, व्यावसायिक तसेच दुकानदारांप्रमाणे ही दुकानात शिरून ज्या प्रकारे कारवाई केली जाते, तशी नागरिकांवर केली जाणार नाही. जे नागरिक रस्त्यावरून जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक पिशवी वापरत असल्याचे आढळून येतील त्यांच्यावरच ही कारवाई होणार आहे. त्यासाठी पहिल्या वेळी पिशवी आढळल्यास 5 हजार रुपये, दुसऱ्यावेळी 10 हजार रुपये तर तिसऱ्या वेळी पिशवी वापरताना आढळल्यास थेट 25 ह्जारांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे विक्रेते आणि उत्पादकांऐवढीच नागरिकांनाही ही अधिसूचना बंधनकारक आहे.

दंडाचे अधिकार आरोग्य निरीक्षकांना
महापालिकेकडून नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार सहायक आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांना देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत राज्यात फक्‍त 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी होती. त्यामुळे केवळ व्यावसायिकांवरच कारवाई केली जात होती. तर नागरिक या पिशव्या वापरत असल्याचे आढळून आल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. मात्र, आता नागरिकही कारवाईच्या कक्षेत आल्याने त्यांच्याकडून दंड आकारणीसाठीचे अधिकार स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे जगताप म्हणाले.

 

प्लॅस्टिक व थर्मोकॉल कचऱ्याची सद्यस्थिती
दैनंदिन कचऱ्यामध्ये सुमारे 9 ते 12 टक्के ( 100 ते 150 टन) इतके प्लॅस्टिक, थर्मोकॉल.


एकही प्रक्रिया अथवा पुनर्वापर प्रकल्प नाही.


वर्षाला जवळपास 4 ते 5 हजार टन बंदी असलेले प्लॅस्टिक जप्त


वर्षाला 3 ते 4 कोटींची दंड वसुली


प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सर्व कचरा भूर्गभात जिरवला जातो.


पिशव्यांचा वापर नागरिकांकडून ओला कचरा साठविण्यासाठी होतो.


प्लॅस्टिक पिशव्यांत ओला कचरा असल्याने वर्गीकरणात अडथळे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)