पुणे : …तर ‘पार्किंग पॉलिसी’चा निवडणुकीत फटका!

धोरण रद्द करा : भाजप नगरसेवकांचीच पक्ष बैठकीत मागणी


नगरसेवकांचा रोष वरिष्ठांना कळविणार


भाजपच्या मुख्यसभेतील भूमिकेकडे लक्ष

पुणे – शहरातील रस्त्यांवर खासगी वाहनांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेली “पार्किंग पॉलिसी’ रद्द करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनीच गुरूवारी पक्ष बैठकीत केली. “या निर्णयामुळे पुणेकरांचा रोष आमच्यावर ओढावला आहे. 2019 च्या निवडणुका आणि पुढील महापालिका निवडणुकांच्या मतदानावरही या निर्णयाचा परिणाम होईल’ अशी भीती नगरसेवकांनी व्यक्‍त केली आहे.

“पार्किंग पॉलिसी’ मुळे प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करत असून त्यांना उत्तरेही देता येत नाहीत. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. दरम्यान, नगरसेवकांची ही नाराजी तातडीने वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे. त्यानुसार, या धोरणाबाबत मुख्यसभेत काय निर्णय घ्यायचा, हे सर्व नगरसेवकांना रात्री उशिरा कळविण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांसह थेट भाजप नगरसेवकच नाराज असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय घेतला जाणार, यावर या धोरणाची अंमलबजावणी होणार की नाही? हे निश्‍चित होणार आहे.

स्थायी समितीने मंजूर केलेले पार्किंग धोरण शुक्रवारी मुख्यसभेत मान्यतेसाठी येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक बोलाविली होती. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भाजपच्याच धोरणाला पक्षाच्या नगरसेवकांनीच विरोध केला आहे. त्यातच हे धोरण मंजूर झाल्यानंतर सोशल मीडिया तसेच विरोधीपक्षांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. पुणेकरांनीही त्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली जात आहे.

आज झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच नगरसेवकांनी या धोरणास विरोध केला. यामुळे मतदार नाराज असून भाजपचे कार्यकर्ते तसेच भाजपला पाठिंबा देणारेही नाराज असल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात आले. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मतदानावर परिणाम पाडणारा हा निर्णय आहे. शहरात भाजपच्या सत्तेला वर्षपूर्ण होत असतानाच या निर्णयामुळे पुणेकर नाराज आहेत. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये, अशी मागणीही नगरसेवकांनी केली.

हेडमास्तरानांही केले गप्प..
नगरसेवक बैठकीवेळी महापालिकेचे वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांना सादरीकरण करण्यास सांगण्यात आले. त्यावर नगरसेवकांनी प्रश्‍न विचारले. मात्र, त्यावर बोनाला यांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे गोगावले यांनी नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. “हे आपल्या पक्षाचे धोरण असून ते मान्यच करावे लागेल’ असे ते म्हणाले. मात्र, त्यानंतरही नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे गोगावले यांनाही गप्प व्हावे लागले. दरम्यान, या सादरीकरणानंतर गोगावेले यांनीही बोनाला यांना काही प्रश्‍न विचारले.

मात्र, त्यांनाही त्याची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे गोगावले यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच रात्री उशिरा नगरसेवकांना या धोरणाच्या निर्णयाची माहिती कळविली जाईल, असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)