..तर तपासलेल्या उत्तरपत्रिका पाठवणार नाही

अर्थमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली : बारावीचा निकाल लांबणार?

पुणे – राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाच्या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर मागे घेण्यात आलेले बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचे आंदोलन आता पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता आहे. अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा फिसकटल्याने आता तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे परत न पाठविण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या निर्णयावर शासन स्तरावर निर्णय होईलच. बारावीचा निकाल वेळेतच लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.
शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महासंघाने बहिष्कार टाकला होता. यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत महासंघाची बैठक झाली. यात काही मागण्यांबाबत अध्यादेश काढण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्याने महासंघाने बहिष्कार मागे घेतला. तसेच उर्वरित मागण्यांबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे बुधवारी अर्थमंत्र्यांसोबत बैठक झाली. यात मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने महासंघाने 26 मार्च रोजी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यानंतरही शासनाकडून दखल न घेतल्यास बारावीच्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा केल्या जाणार नाहीत. तसेच या आंदोलनाचा बारावीच्या निकालावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची राहील, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिला आहे.

निर्णय न झालेल्या मागण्या
– 2003 ते 2011 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनासाठी तरतूद करणे.
– 2011-12 पासूनच्या वाढीव पदांना मान्यता देणे.
– माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करणे.
– 24 वर्षांच्या सेवेनंतर सर्वांना निवडश्रेणी देणे.
– 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ व अंशत: अनुदान तत्त्वावरील शिक्षकांना तसेच दि.1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
– 2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्तीपासून आतापर्यंतची थकबाकी देणे.
– उप प्राचार्य/पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पेमध्ये वाढ करणे. घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन वाढविणे.
– विना अनुदानितची सेवा वरिष्ठ व निवड श्रेणी साठी ग्राह्य धरणे याबद्दलच्या 6 मे 2014 च्या शासनादेशात सुधारणा करणे.
– कायम विना अनुदानित मूल्यांकनास पात्र उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या तातडीने जाहीर करणे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)