…तर टाटा धरणातील पाणी ठरणार वरदान

पाणी वळविण्यासंदर्भात संमिती स्थापन 


अद्यापर्यंत एकही बैठक नाही

पुणे – टाटा जलविद्युत प्रकल्पांसाठी मागील 90 वर्षांपासून मुळशी, लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवाडी आणि ठोकरवाडी या धरणांमधून दरवर्षी 42.50 टीएमसी पाणी पश्‍चिमेकडे वळविण्यात येऊन वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी पुन्हा भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागांना देण्यासाठी शासनाने ऑगस्टमध्ये एक समिती नेमली. या समितीने तीन महिन्यांत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र दोन महिने उलटून समितीची एकही बैठक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना टाटा धरणातून हे पाणी जनतेला मिळाले तर त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. मात्र या प्रश्‍नाकडे शासनाकडून गांभार्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीचे खोऱ्यातील असून या खोऱ्यातील बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करून ते पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्याकरिता करण्याच्या उपाययोजनांसाठी शासनाने ऑगस्ट महिन्यात समिती नेमली. या समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या समितीच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी, औद्योगिक कंपन्यांसाठी आणि सिंचनासाठी जादा पाणी उपलब्ध होऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे 67.50 टीएमसी व टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे 42.50 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. जिल्ह्यातील मुळशी व इतर पाच धरणांतून वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे 42.50 टीएमसी इतके पाणी कोकणात जाते. त्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील दुष्काळी भागांना होत नाही.

पाणी वापराचा क्रम
कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रति जलवर्षाकरिता खोऱ्याबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी व अधिकची मर्यादा ठरवून दिली आहे. राज्य जलनितीनुसारपिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी असा वापरण्याचा क्रम ठरला आहे. तसेच विविध पर्यायांद्वारे वीज उपलब्ध करणे व शक्‍य असल्याने पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीसाठीचे पाणी वळविण्याच्या आवश्‍यकतेबाबत फेरअभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सिंचन प्रकल्प घेण्यावरही मर्यादा
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. औद्योगिक कंपन्याही येत आहेत. त्यामुळे पिण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार असून शाश्‍वत स्वरुपातील पाणी उपलब्ध होत नसल्याने सिंचन प्रकल्प घेण्यावरही मर्यादा येत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने समिती ऑगस्ट महिन्यात नेमली. या समितीने तीन महिन्यांत अभ्यास करून याचा अहवाल शासनाला सादर करणे अपेक्षित आहे. मात्र दोन महिने झाले तरी या समितीची एकही बैठक झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

समितीला मिळणार मुदतवाढ
या समितीला मुदतवाढ देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यांना होणार फायदा
टाटा व कोयना जलविद्युत प्रकल्पांसाठीचे पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविले तर पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)