…तर जून अखेर “जल संकट’

शहरवासियांना चिंता : पवना धरणात 50.78 टक्‍के साठा

पिंपरी – उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असतानाच आता पिंपरी-चिंचवडकरांना पाणी टंचाईची चिंता वाटू लागली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्यस्थितीला 50.78 टक्‍के पाणी साठा असून, हा साठा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पुरवावा लागणार आहे. यावर्षी निर्धारित वेळत वरुणराजाने हजेरी लावली नाही, तर शहरात पाणी कपात किंवा एकवेळ पाणी पुरवठा करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची अपरिहार्यता पाटबंधारे विभागासह नागरिकांवर आली आहे.

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरण गेल्या पावसाळ्यात तुडुंब भरले होते. तरीही या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट शहरवासियांसमोर उभे राहिले आहे. गेल्या पाच वर्षांत 35 टक्के वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत न वाढलेला जलस्त्रोत दुसरीकडे कडक उन्हाळा आणि त्यामुळे पाण्याचे वाढलेले बाष्पीभवन यामुळे उपलब्ध पाणी साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी पाटबंधारे विभाग काळजी घेताना दिसत आहे. पवना नदीमध्ये पाणी सोडताना पाणी वाया जाणार नाही. तसेच, रावेत येथील बंधाऱ्यातून पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

सध्यस्थितीला पवना धरणात 50.78 टक्‍के म्हणजे 4 हजार 323 दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी (दि.23 मार्च) सुमारे 49 टक्‍के पाणी साठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्‍के पाणीसाठा जास्त शिल्लक होता. अद्याप पिंपरी-चिंचवड शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात करण्याचे संकेत नाहीत. सध्या शहराला दररोज 17 ते 18 दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा केला जातो. उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करता आणखी सुमारे 120 दिवस पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण होणार नाही. पण, धरण क्षेत्रातील शेती, सुमारे 40 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरी वस्तीसह शेती आणि औद्योगिक क्षेत्रालाही पाणी पुरवठा करावा लागतो. सुमारे 34 दशलक्ष घनफूट पाणी धरणातून पवना नदीत दररोज सोडले जाते. त्यामुळे जुन- जुलैमध्ये पाणी कपात किंवा एकवेळ पाणी पुरवठ्याचे संकट पिंपरी-चिंचवडकरांवर येवू शकते, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

पवनात सध्या जो पाणी साठा आहे. तो शहराला जुलैअखेर पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पाण्याचा गैरवापर, त्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा, वाढते बाष्पीभवन यावरील सावधगिरीचा उपाय म्हणून पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पाण्याची काटकसर करीत योग्य तेवढाच वापर करण्याची गरज आहे.
– मनोहर खाडे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)