…तर कोल्हापूरच्या महापौरांना काळे फासू – तृप्ती देसाई

कोल्हापूर, दि. 20 (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठरावं मंजूर केला तर भूमाता ब्रिग्रेडच्या वतीने महापौरांना काळे फासण्यात येईल असा इशारा भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.

एकीकडे भूमाता ब्रिगेड राज्यभर दारू मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे कोल्हापुरात दारू दुकान बंद असताना ती सुरू करण्यासाठी कोल्हापूर महापालिका झटत आहे. त्यामुळे कोल्हापूरचे रस्ते हस्तांतरण केल्यास महापौरांना काळे फासू असा इशारा देसाई यांनी दिला आहे. राज्यात दारूबंदी व्हावी यासाठी भूमाता ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यमार्ग आणि महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली मद्य विक्रीची दुकाने, परमिट रूम, बिअर शॉपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशामुळे महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. मात्र शहरातून जाणारे राज्यमार्ग शहरातील भाग म्हणून महानगर पालिकेकडे हस्तांतरण करण्याचा ठराव मांडण्यासाठी काही जणांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मांडण्यात आला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महापालिकेने हा ठराव मंजूर केला तर महापौरांना काळे फासू असा इशारा दिला. तसेच या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नागरसेवकांनाही दारूची बाटली भेट देऊन निषेध नोंदवणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)