….तर केंद्र सरकारला खाली का खेचत नाही? ; उद्धव ठाकरेंचा संघाला रोखठोक सवाल 

मुंबई: केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा बाजूला पडला, आता शिवसेनेने तो लावून धरल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मंदिरासाठी आंदोलनाची गरज वाटू लागली आहे. केंद्रातील सरकार तर संघाच्याच आशिर्वादाने स्थापन झालेले आहे. मग मंदिरासाठी आंदोलनाची गरज भासू लागली असेल तर संघ हे सरकार खाली का खेचत नाही? असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना भवन येथे शिवसेनेचे मंत्री,खासदार,आमदार,जिल्हाप्रमुख यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली होती. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. अयोध्येतील राममंदिरासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येईल असे रा.स्व.संघाचे भैयाजी जोशी यांनी जाहीर केले आहे.त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, देशात आज पहिल्यांदाच हिंदुत्ववादी ते देखील एकाच पक्षाचे पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. पण राममंदिराचा मुद्दा गेल्या चार वर्षांपासून बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता. शिवसेनेने तो लावून धरल्यानंतर आता रा.स्व.संघाला मंदिरासाठी आंदोलनाची गरज वाटू लागली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी 25 तारखेला अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यानंतर आता सर्वांचीच धावपळ सुरू झाली आहे. अयोध्या दौ-यासाठी शिवसैनिकांना कार्यक्रम आखून दिला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. संघाच्या परिश्रमामुळे मजबूत संख्याबळ असलेले सरकार केंद्रात आले आहे असे म्हणतात, तर मग राम मंदिरासाठी संघाला आंदोलनाची गरज का वाटते असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. आताचे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असे मानले जात होते, पण त्यानंतरही राम मंदिर उभे राहत नसेल तर हे सरकार कोणाच्या कामाचे? सत्तेवर आल्यानंतर 370 कलम, समान नागरी कायदा ही वचने का विसरलात? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी उभे रहा! 

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचाही या बैठकीत आढावा घेतला. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा, चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी भक्‍कमपणे उभे राहण्यास आपण शिवसैनिकांना सांगितले आहे. दुष्काळाचा गैरफायदा घेणारे पण असतात.चाराघोटाळा वगैरे होउ नये याकडे शिवसैनिक लक्ष देणार आहेत. दुष्काळग्रस्तांना लागेल ती मदत करण्यात यावी असे आदेश आपण शिवसैनिकांना दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राउत, आमदार डॉ.नीलम गो-हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)