…तर कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतो!

पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ठरवून दिलेले वसुलीचे महसूल उद्दीष्ट पूर्ण केल्यास प्रशासकीय कारवाई मागे घेण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले. त्याकरिता 31 मार्च 2019 ची “डेडलाईन’ दिली आहे.

उद्दीष्ट पूर्तीमध्ये समाधानकारक कामगिरी बजावू न शकलेल्या 73 कर्मचाऱ्यांवर विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त हर्डीकर यांनी भेट घेत, ही कारवाई मागे घेण्याची मागणी. आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि. 28) पार पडलेल्या या बैठकीला महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, कर संकलन विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या कर संकलन विभागाने सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता 560 कोटी वसुलीचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 305 कोटी मिळकत कर जमा झाला आहे. येत्या चार महिन्यांत 255 कोटी वसूल करण्याचे आव्हान या विभागासमोर आहे. दरम्यान या विभागातील एकूण 114 कर्मचाऱ्यांना मिळकत कर वसूल करण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी उद्दीष्ट गाठणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली अहे. तर 50 ते 75 टक्के मिळकत कर वसूल करणाऱ्या 38 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 75 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत वसूल करणाऱ्या 17 कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तर 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वसुली करणारे 41 कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत.

या कारवाईच्या विरोधात या कर्मचाऱ्यांनी कर्मचारी महासंघाकडे दाद मागितली आहे. त्यानंतर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर राहुल जाधव यांची मंगळवारी (दि. 27) भेट घेत ही कारवाई मागे घेण्याची विनंती केली. आयुक्त श्रावण हर्डीकर हे मंगळवारी महापालिका मुख्यालयात नसल्याने त्यांच्याशी या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. बुधवारी आयुक्त कार्यालयात या विषयावर बैठक झाली. ही कारवाई अन्यायकारक असून, ती मागे घेण्याची मागणी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी प्रशासनाची भुमिका स्पष्ट केली. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात करसंकलन विभागाची महत्त्वाची भुमिका आहे, या विभागातील कर्मचाऱ्यांना शास्ती, अनधिकृत बांधकाम आणि मूळकरवगळून उद्दीष्ट दिले असताना देखील हे कर्मचारी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे गावडे यांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी यावेळी समर्थन केले. यावेळी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची या बैठकीत चर्चा झाली.

127 गाळेधारकांकडे पाच कोटींची थकबाकी
महापालिका मालकीच्या 127 गाळेधारकांकडून पाच कोटींचा मिळकत कर येणे बाकी आहे. एसआरए स्किममधील नागरिकांकडून मिळकत भरण्यात फारसे स्वारस्य दाखविले जात नाही. तसेच रस्ता रुंदीकरण व अन्य कारवाईमुळे पाडलेल्या मिळकतींची कागदोपत्री थकबाकी दिसत आहे. तर प्राधिकरणाच्या हद्दीतील नियोजित रस्ता अथवा आरक्षणातील मिळकतधारकांना प्रधिकरण प्रशासनाकडून दर चार महिन्यांनी नोटीस बजावली जात आहे. या मिळकतधारकांकडून वसुली करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, या सर्व बाबींचा कर्मचाऱ्यांच्या उद्दीष्टपूर्तीवर विपरित परिणाम होत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

कर्मचाऱ्यांना मदत करू – आयुक्‍त
कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेले उद्दीष्ट गाठण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्यानंतर या सर्व अडचणी त्यांनी वेळीच आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वसुलीत येणाऱ्या अडचणींचे त्याचवेळी निराकरण केले जाईल. येत्या 31 मार्च 2019 पर्यंत या कर्मचाऱ्यांनी उद्दीष्टपूर्ती करावी. त्यांच्यावरील कारवाई निश्‍चितपणे मागे घेण्याचे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या शिष्टमंडळाला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)