…तर ऊसतोडणी मजूर रस्त्यावर उतरेल

पंकजा मुंडे यांचा इशारा; खरवंडीत कामगार, मुकादमांचा मेळावा
पाथर्डी – दसऱ्यापर्यंत ऊसतोडणी कामगारांचे महामंडळ व दरवाढीची मागणी मंजूर करा. अन्यथा, कोयता बंद करून राज्यातील ऊसतोडणी कामगार रस्त्यावर उतरेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. दसऱ्यापर्यंत कोयता बंद ठेवत संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
खरवंडी कासार येथे ऊसतोडणी कामगार व मुकादम यांचा मेळावा पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी आ. मोनिका राजळे होत्या. या वेळी व्यासपीठावर खा. दिलीप गांधी, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, माजी आ.गोविंद केंद्रे, केशव आंधळे, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, राहुल कारखिले, अर्जुन शिरसाठ, मोहनराव पालवे, अमोल गर्जे, संजय कीर्तने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, की ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने तोडणी कामगारांच्या मनामध्ये नाराजी आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. मुख्यमंत्र्यांनी कामगारमंत्र्यांना तात्काळ आदेश दिले. ऊसतोडणी कामगार महामंडळातून लोकांना घरे मिळाली पाहिजेत. मुलांना व्यवसायासाठी कर्ज मिळाले पाहिजे, शिक्षणाची सोय झाली पाहिजे, अशा प्रकारचा एक पूर्ण आराखडा तयार करून मी मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. पुढची पीढी ऊस तोडण्यासाठी जाणार नाही, अशी सोय करण्याचे माझे स्वप्न आहे. पाच वर्षांचा पूर्वी कधीच झाला नव्हता. तो आपण केला. करार करताना साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष जयंत पाटील व शरद पवार यांना आम्ही सांगितले होते, की साखरेचे भाव वाढतील तेव्हा करारात बदल व्हायला हवा. कामगारांना दर वाढवून मिळायला हवेत. साखरेचे भाव 1900 रुपयांवरून 2900 रुपये झाले आहेत. ऊसतोडणी कामगारांना आता दरवाढ करून दिलासा द्यायला हवा. गेल्या दोन बैठकांमध्ये दरवाढीची मागणी लावून धरली आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यावर आंदोलनाची वेळ येऊ दिली नाही. बैठकीतूनच त्यांनी निर्णय घेण्यास भाग पाडले; मात्र आता तशी वेळ आली, तर आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देऊन त्या म्हणाल्या, “”गोपीनाथ मुंडे यांनी वंचितांसाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी ऊसतोडणी कामगारांच्या घरात जन्म घेऊन कारखानदारापर्यंत प्रवास केला. पुण्यामध्ये दुर्दैवी घटना घडली. छोट्याशा चिमुरडीवर अत्याचार झाला. त्यातही काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मी असला कुठलाही तमाशा न करता घटना घडली त्या दिवशी पहाटे प्रीतम मुंडे यांना पीडितांच्या घरी पाठवले. त्यांना मदत करून दिलासा देण्याचे काम केले. हा काही राजकारण करण्याचा मुद्दा नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
शासकीय महाविद्यालयांत प्रवेश झालेल्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एकवीस हजार रुपयांचा चेक दसरा मेळाव्यात वाटप करण्याची घोषणा त्यांनी केली. ज्येष्ठ नेते अशोक चोरमले यांच्या “भारत माता प्रतिष्ठान’च्या वतीने ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहाला मुंडे यांनी एक लाखाचा मदतीचा चेक दिला. मेळाव्याला चार तास उशीर होऊनही लाखोंच्या संख्येने ऊसतोडणी कामगार हजर होते. प्रास्ताविक संपत कीर्तने यांनी केले. वामन कीर्तने यांनी आभार मानले.

कोयता हातातून जाईल, ती स्वप्नपूर्ती

-Ads-

“”गोपीनाथ मुंडे यांना तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे त्यांनी चाळीस वर्ष तुमच्या मनातील खुर्चीवर राज्य केले. तुमच्या सुखदुःखाची सोडवणूक करणे माझे कर्तव्य आहे. आयुष्यामध्ये आलेली अनेक संकटे मी तुमच्या बळावर जिंकलेली आहेत. त्यामुळे माझ्यातील मंत्री किंवा कारखानदार कधीही जागा होणार नाही.कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता जाऊन त्यांच्या हातात डिग्री येईल, तेव्हा माझे स्वप्न पूर्ण होईल, ”असे मुंडे म्हणाल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)