…तर उन्हाळ्यात मोठी पाणी कपात

आता वाचवाल, तरच उन्हाळ्यात पुरेल : नागरिकांना तयार करा


पुण्याच्या पाणी कपातीचा निर्णय लवकर घ्या


जलसंपदामंत्री महाजन यांचा सूचना वजा आदेश

पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा पाहता, पुणे शहराने पाण्याची कपात केली तरच उन्हाळ्यात शहराला पाणी मिळेल. अन्यथा त्यावेळी कठीण स्थिती निर्माण होईल. त्यामुळे महापालिकेने पाणी कपातीबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना वजा आदेश राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिले.

रविवारी एका लग्नानिमित्ताने पुण्यात आलेल्या महाजन यांनी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांची महापौर बंगल्यावर अनौपचारीक बैठक घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराला एकवेळ पाणी देण्यासाठी सुमारे महापालिका दररोज सुमारे 1,350 एमएलडी पाणी घेतले जात आहे. हे पाणी लोकसंख्येच्या निकषापेक्षा कितीतरी अधिक असल्याने यापुढे पालिकेने शासनाने मंजूर केलेल्या कोट्याप्रमाणे दररोज 900 एमएलडी पाणीच शहरासाठी घ्यावेत, असे आदेश जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने महापालिकेस दिले आहेत. तर याची अंमलबजावणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पालिकेकडे तगादा लावला आहे. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी या दोन्ही विभागाच्या झालेल्या बैठकीत पाण्यावरून वादही झाले. त्यानंतर रविवारी दुपारी अचानक पुण्यात आलेल्या महाजन यांनी महापौर बंगल्यावर ही बैठक घेतली. त्यात बंद जलवाहिनीमुळे 100 एमएलडी पाणी वाचविल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेस हे वाचविण्यात आलेले पाणी गृहीत धरून दररोज 1,350 एमएलडी पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिका केवळ 50 एमएलडीच वाचवित असल्याचे सांगत “आता पाणी कमी केले नाही तर एप्रिल आणि मेमध्ये कठीण परिस्थिती निर्माण होईल,’ असे सांगितले. त्यानंतर महाजनांनी याबाबत कोणताही निर्णय दिला नसला, तरी “पाण्याची सध्याची स्थिती पाहता कपात वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आतापासूनच महापालिकेने नागरिकांचे मन तयार करून तातडीने निर्णय घ्यावा. ही कपात न केल्यास उन्हाळ्यात पुणेकरांना यापेक्षाही मोठ्या कपातीचा सामना करावा लागेल,’ असे संकेत दिले.

पक्षनेत्यांशी चर्चा करणार
या बैठकीत महापौर टिळक आणि पालकमंत्री बापट यांनी “शहराच्या पाण्यात कपात करू नये,’ अशी मागणी केली. मात्र, त्याला पर्याय नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आता “पुढील आठवड्यात पक्षनेत्यांची बैठक घेऊन त्यात चर्चा करण्यात येईल,’ असे महापौर आणि बापट यांनी महाजन यांना स्पष्ट केले. त्यासाठी बैठक बोलाविण्याच्या सूचनाही या बैठकीनंतर देण्यात आल्या आहेत.

महापालिका म्हणते, किमान 1,250 एमएलडी तरी पाणी द्या
या बैठकीत पाटबंधारे विभागाने पालिकेने दररोज 1,150 एमएलडी पाणी घ्यावे, असा आग्रह धरला. तसेच जलसंपदामंत्रीही त्यासाठी आग्रही होते. त्यामुळे महापालिकेने एक पाऊल मागे घेत किमान 1,250 एमएलडी पाणी मिळावे अशी मागणी केली. मात्र, त्यालाही पाटबंधारे अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. मात्र, महापालिकेने ही मागणी कायम ठेवली असून त्याबाबत तुर्तास काहीही बोलण्यास महाजन यांनी या बैठकीत नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)