तर अमित शहा त्या वक्तव्याची माफी मागणार आहेत का?

शिवसेनेचा भाजपला सवाल
मुंबई – कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी हिंदु पाकिस्तान असा शब्दप्रयोग वापरून जे वक्तव्य केले आहे त्या बद्दल राहुल गांधी यांनी जनतेचे माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्याचा संदर्भ देत शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. तुम्हाला जर या प्रकरणात राहुल गांधी यांची माफी हवी असेल तर भाजपच्या उत्तरप्रदेशातील आमदाराने भगवान रामही भारतातील बलात्काराचे प्रकार रोखू शकत नाहीत असे जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे माफी मागणार आहेत काय असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात केला आहे.

कॉंग्रेसचे केरळातील खासदार शशी थरूर यांनी बुधवारी असे वक्तव्य केले होते की सन 2019 च्या निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाचे हिंदु राष्ट्र करतील आणि येथे अल्पसंख्याकांना कोणतेही स्थान नसेल. पाकिस्तानात अल्पसंख्यांची जशी अवस्था झाली आहे तशीच भारताची स्थिती होईल म्हणजेच भारत हा हिंदु पाकिस्तान होईल असे ते म्हणाले होते. त्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेऊन राहुल गांधी यांनी या प्रकरणी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर मत व्यक्त करताना शिवसेनेने म्हटले आहे की थरूर यांनी भाजपचीच भाषा कॉंग्रेसच्या व्यासपीठावर वापरली आहे. त्यासाठी राहुल गांधींची त्यांना माफी हवी आहे. पण भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी श्रीरामांचा अवमान करणारी भाषा वापरली आहे त्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी माफी मागायला नको काय असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसने केलेल्या चुका सुधारण्याची संधी देशाने भाजपला दोनदा दिली होती पण त्यांना ती संधी साधता आली नाही अशी टीकाहीं शिवसेनेने केली आहे. भारताला हिंदुराष्ट्र घोषित करायचे असेल तर ते मोदींनी आत्ताच घोषित करून दाखवावे त्यासाठी 2019 ची वाट पाहण्याची गरज काय असा सवालही शिवसेनेने या मुखपत्रातील अग्रलेखात केला आहे. पाकिस्तानची स्थिती त्यांच्या जन्मापासूनच खराब आहे पण भारतातील स्थिती तरी किती सुधारली आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे.

मोदी सरकारच्या काळात देशातील गरीबांची स्थिती आणखीनच बिकट झाली असून हे सरकार गायी आणि शेळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र ते थांबवू शकलेले नाही असा टोमणाहीं शिवसेनेने मोदींना मारला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधू न शकलेल्या सरकारने रामायण एक्‍स्प्रेस नावाची रेल्वे सुरू करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. सन 2019 पर्यंत असे रंगीबेरंगी फुगे मोदी सरकारकडून उडवले जातील पण त्याला रामराज्य म्हणता येणार नाही असेही सेनेने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)