…. तर अवसायकाची गरज काय?

     वस्तुस्थिती

     हेमंत शहा

सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कारभार योग्य रीतीने चालत नसेल, तर सहकार निबंधक कार्यालयाकडून संबंधित सोसायट्यांवर अवसायक नेमला जातो. वस्तुतः अवसायक म्हणून नेमलेल्या व्यक्‍तीची कर्तव्ये वेगळीच असतात. गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत मात्र तो हिशेबपत्रके पूर्ण करून घेणे आणि त्यांचे लेखापरीक्षण करून घेणे एवढीच कामे करताना आढळतो. गृहनिर्माण सोसायट्यांचे कामकाज सुरळीत न राहण्यास अनेक बाबी जबाबदार आहेत. पोटनियमांत बदल करून आधी या बाबी निकालात काढल्या पाहिजेत.

योग्य प्रकारे न चालणाऱ्या सहकारी संस्थांवर सहकार निबंधकांकडून अवसायक नेमण्यात येतात; परंतु सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नेमण्यात येणारे अवसायक त्यांची मूलभूत कामे सोडून इतरच कामे करताना दिसतात. निबंधकांना केवळ सोसायट्यांची हिशेबपत्रके आणि त्यांचे लेखापरीक्षण केलेले असणे आवश्‍यक असते आणि हीच कामे पूर्ण करून घेताना अवसायकांची त्रेधा उडाल्याचे दिसते.

वस्तुतः कायद्यानुसार अवसायक म्हणून नेमलेल्या व्यक्‍तीचे हक्‍क आणि कर्तव्ये खूप वेगळी आहेत. एकेका अवसायकाकडे अनेक सोसायट्यांचे काम सोपविले जाते. त्यामुळे त्यांना आपली खरी भूमिका योग्य प्रकारे पार पाडता येत नाही. गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या कमी-अधिक फरकाने समानच असतात आणि पोटनियमांत बदल करण्याचा सोपा मार्ग त्यासाठी अवलंबिला पाहिजे. ते न करता अवसायक नेमला जातो; परंतु अवसायकाच्या कायदेशीर  जबाबदाऱ्या वेगळ्याच असतात. त्या आपण आधी समजून घ्यायला हव्यात.

 अवसायकाचे अधिकार

सहकार कायदा कलम 103 अंतर्गत निबंधकाच्या नियंत्रणाखाली तसेच मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी नेमणूक झालेल्या अवसायकाला नियम आणि सर्वसाधारण देखरेखीचे अधिकार असतात. सोसायटीच्या वतीने दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाच्या कोणत्याही कारवाईचे कार्यान्वयन सोसायटीच्या वतीने करणे; तसेच सोसायटीच्या वतीने अशा खटल्यांमध्ये बाजू मांडणे सोसायटीचा व्यवसाय पूर्णतः थांबविण्याची वेळ येईपर्यंत अवसायक या व्यवसायाचे संचालन करणे. तसेच सोसायटीच्या मालकीची कोणतीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता लिलावाद्वारे किंवा खासगी कंत्राटाद्वारे कोणत्याही व्यक्‍तीला किंवा संस्थेला पूर्णतः किंवा अंशतः विकणे सहकारी संस्थेच्या मालमत्तेचे बाजारभावाप्रमाणे मूल्य करून समान उद्दिष्टासाठी नोंदणीकृत केलेल्या दुसऱ्या संस्थेस किंवा सरकारी अस्थापनाकडे विक्रीद्वारे ती मालमत्ता हस्तांतरित करणे अवसायनात निघालेल्या सहकारी संस्थेची वा सोसायटीची मालमत्ता निबंधकाच्या परवानगीने समान उद्दिष्टांसाठी स्थापन झालेल्या सहकारी संस्थेस किंवा सरकारी अस्थापनास भाड्याने देणे. तसेच आवश्‍यकता भासल्यास अवसायनात निघालेल्या संस्थेची मालमत्ता तारण ठेवून कर्ज उभारणी करणे

संस्थेवर काही व्यक्‍तीनी किंवा व्यक्‍तिसमूहांनी, संस्थांनी कर्जवसुलीसाठी केलेल्या दाव्यांची शहानिशा करून देणेकऱ्यांची क्रमवारी ठरविणे आणि निधीच्या उपलब्धतेनुसार त्यांची देणी पूर्णतः किंवा अंशतः देण्याचा प्रयत्न करणे. अशी देणी फेडल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास संस्था अवसायनात निघाल्याच्या दिवसापासून निबंधक सांगतील त्या दराने व्याज दिले जाते; परंतु हा व्याजदर संस्थेशी संबंधिताने केलेल्या करारातील व्याजदरापेक्षा अधिक असत नाही. संस्थेकडून वर्तमानात किंवा भविष्यात रक्‍कम येणे असल्याचे दावे काही व्यक्‍ती किंवा संस्था करू शकतात. त्यांच्या दाव्यांतील तथ्य पाहून त्यांच्याशी तडजोड करण्याचे अधिकार अवसायकाला असतात.

संस्थेकडून रक्‍कम येणे असल्याचे दावे भविष्यात संस्थेवरील कर्जात परिवर्तित होऊ शकतात. वर्तमानातील किंवा भविष्यातील कर्ज वाढू शकेल, अशी शक्‍यता असलेल्या सर्व दाव्यांमध्ये तडजोड करण्याचा अधिकार अवसायकाला असतो. संस्थेचे वर्गणीदार, विशिष्ट किंवा आनुषंगिक देणेकरी यांचा दावा करणाऱ्यांमध्ये समावेश असू शकतो. तसेच वर्गणीदार किंवा अन्य मार्गांनी संस्थेला काही व्यक्‍ती वा संस्थांकडून येणेही असू शकते. संस्थेच्या देणेकऱ्यांना अशा व्यक्‍ती आणि संस्थांकडून रक्‍कम मिळण्याची तजवीज करता येते आणि त्यासाठी मार्ग ठरविण्याचे आणि तशी योजना तयार करण्याचे काम अवसायक करू शकतो. संस्थेच्या मालमत्तेवर किंवा अवसायनाच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकणाऱ्या सर्व देण्यांच्या आणि कर्जांच्या बाबतीत शर्ती ठरविणेही अवसायकाच्या अधिकारात असते.

संस्थेला येणे असणाऱ्या रकमेच्या बाबतीत तो सिक्‍युरिटी प्राप्त करू शकतो. अवसायनाच्या प्रक्रियेचा खर्च कोणाकडून आणि कोणत्या प्रमाणात वसूल करावयाचा, याचा निर्णयही तोच करतो. संस्थेकडून येणे असलेल्या व्यक्ती वा संस्थांनी आपले दावे कधीपर्यंत सिद्ध करायचे, याची मुदत अवसायक ठरवतो. संस्थेची किंवा सोसायटीची फेररचना होऊ शकते, अशी खात्री पटण्यास योग्य कारणे असतील, तर निबंधकाच्या पूर्वपरवानगीने अवसायक तसा निर्णय घेऊ शकतो.हाउसिंग  सोसायटी म्हणजेच सरकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत सोसायटीचे पदाधिकारी कोणताही मोबदला न घेता आपला बहुमूल्य वेळ देतात आणि सोसायटीच्या उन्नतीसाठी शक्‍य ते प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की, कोणताही मोबदला न घेता काम करणारे पदाधिकारी आपले नोकर वा गुलामच आहेत, अशी भावना उर्वरित सभासदांची बनलेली असते.

काही वेळा स्वेच्छेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा अवमान करेपर्यंत मजल जाते. वेळच्या वेळी हिशेबपत्रके तयार नसणे, कागदपत्रे योग्य अधिकाऱ्यांना वेळच्या वेळी न पोहोचणे अशा घटना या वातावरणामुळेही घडू शकतात आणि मग निबंधक संबंधित सोसायटीवर अवसायकाची नेमणूक करतात; परंतु या ठिकाणी काही प्रश्‍न उपस्थित होतात. एका अवसायकाकडे किती सोसायट्यांची जबाबदारी द्यायची याचे काही प्रमाण ठरलेले असते का? अवसायकाकडे दिल्या जाणाऱ्यासोसायट्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला पुरेशी यंत्रणा आणि सामग्री उपलब्ध करून दिली जाते का? सोसायटीची हिशेबपत्रके पूर्ण करून घेणे, त्याचे लेखापरीक्षण करून घेणे आणि ती निबंधकाकडे सादर करणे एवढीच अवसायकाची भूमिका आहे का? कारण अवसायक म्हणून नेमणूक झालेली व्यक्‍ती हीच कामे करीत असल्याचे बहुतांश प्रकरणांमध्ये दिसून येते.

ज्या सभासदांनी वर्गणीची रक्‍कम पूर्ण भरलेली नसते, त्यांनाच सोसायटीविरुद्ध आणि अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी करण्याचा अधिकार दिला जातो. कोणत्याही प्राधिकरणाने जर एखाद्या व्यक्‍तीला चुकीचे आणि अवास्तव बिल पाठविले तरीही त्या व्यक्‍तीला आधी बिलाची संपूर्ण रक्‍कम भरावी लागते. त्यानंतर लेखी तक्रार करून तो बिलाला आव्हान देऊ शकतो. या तक्रारीची शहानिशा होते आणि बिल जास्त पाठविल्याचे आढळून आल्यास संबंधिताला जादा भरलेली रक्‍कम माघारी मिळते. हीच साधी सोपी प्रक्रिया सहकार निबंधक आणि सहकार न्यायालये सहकारी सोसायट्यांची बिले थकविणाऱ्यांबद्दल का उपयोगात आणत नाहीत, असाही प्रश्‍न पडतो. असे केल्यास संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवरील मोठे ओझे कमी होण्यास मदत होईल. तसेच या प्रक्रियेमुळे सोसायटीचे वर्गणीचे पैसे थकविण्याची सभासदांची मानसिकताही नष्ट होऊ शकेल. त्यामुळे नियमावलीत अशा प्रकारचे बदल तातडीने करून घेणे आवश्‍यक आहे. सर्व बाजूंनी दबाव वाढल्यास अशा प्रकारचा बदल पोटनियमांमध्ये करणे भाग पडेल आणि त्यानंतर सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे बरेचसे कामकाज सुरळीत होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)