तरूणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन तरूणीची आत्महत्या

शिरूर-कोळआळी न्हावरे (ता. शिरूर) येथे तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने घरातील बाथरूमच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना 28एप्रिल दुपारी अडीच ते सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
आत्महत्या केलेली अल्पवयीन तरूणी अकरावीत शिकत होती. याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर त्रास देणारा तरूण सुहास उर्फ सनी जगन्नाथ मोरे (रा. बाजारतळ, न्हावरे, ता. शिरूर) हा फरार झाला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तीन आठवड्यांपूर्वी ही मुलगी शाळेत येत- जात असताना आरोपी सनी हा मुलीला रस्त्यात अडवून माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून शारिरीक संबंधाची मागणी करीत असे. ही गोष्ट पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली. आईने ही बाब तिच्या वडिलांच्या कानावर घातली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सनी मोरे यांस समक्ष भेटून असा वागू नको मुलीला त्रास देऊ नको, म्हणून गावातील दोन प्रतिष्ठित लोकांसमोर संगितले होते. त्यानंतर 28एप्रिल दुपारी अडीच वाजता मुलीचे वडील घरी येत असताना त्यांना घरासमोर सनी हा मुलीचा हात पकडून काहीतरी बोलत असल्याचे दिसले. सनीने मुलीच्या वडिलांना पाहून तेथून पळ काढला, वडिलांनी मुलीला काय झाले? असे विचारले असता “सनी याने माझा हात धरून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करीत होता. त्यास मी नकार दिल्याने त्याने मला मारहाण केली.’ याबाबत “आपण पोलिसांत फिर्याद देऊ’, असे वडिलांनी मुलीला सांगितले. मात्र ऊन जास्त असल्याने सायंकाळी जाण्याचे ठरले. त्यावेळी पीडित मुलीने “मी सनी मोरेच्या त्रासाला वैतागले’ असे सांगितले. त्यानंतर वडील घरात गेले.
सायंकाळी पाचच्या सुमारास मुलीच्या नात्यातील महिलेने घराचा दरवाजा वाजवून पीडित मुलीच्या वडिलांना मुलगी दिसत नसल्याचे सांगितले. तिचा शोध घेतला असता मुलगी सापडली नाही; परंतु घराच्या बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा वाजवला तो उघडला नाही म्हणून त्यांनी पाठीमागे खिडकीतून डोकावले असता मुलीने बाथरूमच्या छताला ओढणीने गळफास घेतला होता.
याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, सनी जगन्नाथ मोरे यांच्या विरोधात विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पॉस्को कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. बी. पाटील करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)