तरुण आणि वाचन संस्कृती

आजची पिढी सोशल मीडियामध्ये इतकी गुंतून गेलीय, की जणू त्यांना दुसऱ्या कशाचीही भ्रांत नाही. वेळ काढून पुस्तकांच्या दुकानात जावे… मनसोक्त खरेदी करावी आणि नंतर एका-एका पुस्तकाचा फडशा पाडावा, आवर्जून एखाद्या ग्रंथालयाचे सभासद व्हावे आणि वाचनाची अभिरूची जोपासावी, अशी पुस्तकवेडी तरुण मंडळी तुलनेने आज कमी दिसतात. हा सर्व बदल घडलाय तो सोशल मीडियामुळे.

सोशल मीडियाची वाढ आणि वाचन संस्कृतीच्या ऱ्हास, असे चित्र आहे. सोशल मीडिया दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करत असल्याने वाचनसंस्कृती कशी टिकवायची, हा प्रश्‍न आहे. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्‍यक आहे. तरुणांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणं गरजेचं आहे. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. ती मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. असं कारण सांगितलं जातं. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. यामध्ये तरुणांचा दोष नाही.पालकांच्या सांगण्यात आणि वागण्यात फरक पडत आहे. मुले पालकांचे ऐकत नाहीत, म्हणून पालकांनी स्वत: वाचले पाहिजे आणि नंतर मुलांना सांगितले पाहिजे. धावपळीच्या युगात वाचनासाठी वेळ मिळत नाही, असे कारण न देता पालक, मुलांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करून वाचन छंद जोपासला पाहिजे. तरुणांमधील सर्जनशिलता वाढविण्यासाठी तरुणांना वाचनवेड लागेल असे वाचन निर्माण होणेही आजच्या काळाची गरज आहे. लोकमान्यांनी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा असा संदेश दिला. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी दिला. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांच्या दुनियेत गुंतल्यामुळे त्यांच्या उपदेशाकडे नव्या तरुण पिढीचे लक्ष नाही.

जीवनात वाचन हे नुसते व्यसन न राहता, तो जीवनाचा श्‍वास झाला पाहिजे. वाचन जीवनाला उन्नत करणारी बाब असून माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करीत असून मन संकुचित, शूद्र गोष्टींत अडकत नाही म्हणून आजच्या तरुण पिढीने वाचायला शिकले पाहिजे. शेवटी एकच सांगू इच्छितो समाजात जशी माणसं वाचायला शिकतात, तशी कधीतरी पुस्तकेही वाचायला शिका जीवनाचे, आपल्या तरुण व मानव समाजाचे सार्थक होईल.

– भगवान केशव गावित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)