तरुण, अल्पवयीन मुले पॉर्न चित्रपटांच्या जाळ्यात

नीरा-विनयभंग, बलात्काराची प्रकरणे कानावर आली की समाजमन हळहळते, व्याकूळ होते. अशा प्रकरणात न्यायालयाने आतापर्यंत अनेक समाजकंटकांना कठोर शिक्षा सुनावली आहे; मात्र तरीही रोज अशा केसेस पोलीस ठाण्यात दाखल होतात ही शोकांतिका आहे. शोषण किंवा अत्याचार करणारा बऱ्याचदा कोणी बाहेरील व्यक्ती नसून तो परिचयाचाच असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. आजकाल लहान मुलांचे पॉर्न चित्रपट पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढत असून आईवडिलांच्या नजरा चुकवून मुले चित्रपट पाहतात. हजारो तरुण तरुणीही असे चित्रपट पाहणे पसंत करीत असल्याने पॉर्न चित्रपट म्हणजे एकप्रकारची फॅशन होत चालली असून लैंगिक अपराधांना त्यामुळे वाढीव ऊर्जा मिळत आहे.
मानवी जीवनात लैंगीकतेला खूप महत्व असल्याचे मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राईड यांनी म्हटले आहे. वास्तविक तेही तितकेच खरे आहे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे लैंगिकता ही सुद्धा माणसाची गरज आहे. मात्र लैंगिक भावना शमविण्यासाठी आजकाल अयोग्य मार्ग चोखाळले जात असून यामुळे लैंगिक अपराधांना चालना मिळत आहे. आजकाल लहान मुलांच्या हातात पालक सर्रास मोबाईल देतात. संगणकावरही मुले तासन्‌तास असतात. एवढ्या वेळ आपली मुले काय करतात? याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. 12 वर्षांपासून पुढील वयोगटातील मुले पॉर्न चित्रपट पाहत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिक्षण घेण्याच्या, बहरण्याच्या वयात मुले दुसरीकडे भरकटत असल्याने याकडे समाजमनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण व त्यावरील कायद्याची कठोरात याबाबत थोड्याफार प्रमाणात का होईना; परंतु विद्यार्थ्यांना माहिती करून देणे गरजेचे आहे.
भारतीय संस्कृतीत दमन हा विचार अनेकदा अधोरेखीत झाला आहे; मात्र पॉर्न चित्रपट, पाश्‍चात्य संस्कृतीचे होणारे अंधानुकरण यामुळे लैंगिक अपराधांना बळ मिळत आहे. पुरुषांसाठी स्त्री ही भोगवस्तू असल्याची भावना अशा चित्रपटातून दिसते आणि ती लैंगिक अपराधांना चालना देण्याचे काम करते. एकीकडे लैंगिक अपराधांना कमी कसे करावे? याचे सर्व्हेक्षण सुरू असतानाच मोबाईलच्या रूपाने आधुनिक यंत्र हातात आले आणि इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्‍लील मेसेज, चित्रपट फॉरवर्ड केले जाऊ लागले. शाळा, विद्यालये, पाहुण्यांची घरेही आजकाल मुलांसाठी सुरक्षित राहिली नाहीत. प्रेमाच्या नावाखाली वासनेचा कोंडलेला अंधार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. आजकाल सार्वजनिक ठिकाणीही तरुण – तरुणी सभ्यपणा गाठोड्यात ठेवून अश्‍लील चाळे करताना पाहायला मिळतात. सणावारी रेव्ह पार्ट्या पार पाडतात आणि त्यातही अश्‍लील चाळे होतात. पोलिसांकडून कारवाई होत नाही, न्यायालयात कठोर शिक्षा मिळत नाही असे अजिबात नाही. कायद्याचा फार्स कितीही आवळला तरीही अशी प्रकरणे घडतच आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी लैंगिक शिक्षण व संस्कृतीचे जतन या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे.

 • सायंकाळ झाली की दिवाबत्ती करून शुभंकरोती होत नाही. राम, लक्ष्मण, सीता, कृष्ण, भीम-अर्जुन यांच्या पराक्रमाच्या कथा, कुराण, बायबलच्या वाचनाऐवजी मोबाईलमधील ऍनिमेशनपट पाहत आजकाल लहान मुले मोठी होत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीने लहान कुटुंबात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नाही. परस्त्रीचा आदर करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा मुलांपर्यंत पोहचत नाहीत. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस हा संदेश देणाऱ्या श्‍यामच्या आई पुस्तकाचे वाचन होत नाही. थोडक्‍यात आपण आपले संस्कार हरवत असून यांचे सिंहावलोकन करणे गरजेचे आहे.
  -अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधीक्षक भोर
 • या उपाययोजना आवश्‍यक
  मुलांवर लहानपणापासूनच संस्कार व्हायला हवेत. यासाठी पालकांमध्येच जागृती व्हायला हवी.
  प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे. केवळ कामाच्या किंवा पैसा कमावण्याच्यापाठी लागलेल्या पालकांमुळे मुलांच्या संस्कारावर दुर्लक्ष होत आहे.
  मुलगा असो की मुलगी वयात येताना त्यांना योग्य प्रकारे लैगिक शिक्षण मिळायला हवे. हे शाळा कॉलेजातून व्हायला हवेच, त्याच बरोबर घरातूनही याबाबत मार्गदर्शन व्हायला हवे.
  तरुण वय हे जिज्ञासेचे वय असते. अशावेळी त्यांच्या पासून एखादी गोष्ट लपवाल्यास त्याबाबत अन्य मार्गाने माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करणारच.
  निर्भया पथकाच्या माध्यमातून याबात जनजागृती करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहेच याला साथ पालकांकडून मिळायला हवी.
  मुलांना मोबाईल व कॉप्युटर सारखी साधने देताना त्याचा योग्य होतो आहे का? हे पाहणे आवश्‍यक आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)