‘तरुणाई’ कुणाच्या बाजूने?

– प्रा. पोपट नाईकनवरे 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 8.1 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणार आहेत. 2014 ची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत. यात अनेक मतदार असेही आहेत, ज्यांनी 2018 च्या अखेरीस पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथम मतदान केले. त्यामुळे अनेक नव्या मतदारांचा कल लोकसभेच्या मतदानापूर्वी स्पष्ट झाला आहे. सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून, युवा पिढीने विवेकाने मतदान केल्यास देशाचे भवितव्य ठरविण्यात या पिढीची भूमिका निर्णायक ठरू शकते. कारण निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 282 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य तरुणांच्या हाती असल्याचे स्पष्ट होत आहे.

निवडणुकीच्या काळात युवकांच्या आकांक्षा आणि मांडले जाणारे मुद्दे कोणतेही असोत, निवडणुकीच्या माध्यमातून युवकांमध्ये होत असलेल्या बदलांची झलक पाहायला मिळणार, हे निश्‍चित झाले आहे. जेव्हा वयाची 18 वर्षे पूर्ण करून पहिल्यांदा निवडणूक केंद्रासमोरच्या रांगेत मतदार उभा राहतो, तेव्हा तो काहीसा अपरिपक्व असतो, असे मानले जाते. त्यामुळेच तो सामान्यतः निष्पक्ष मतदान करतो, असे मानले जाते. आता प्रत्येक युवकाच्या हातात मोबाइल फोन असल्यामुळे धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्राची प्रत्येक खबरबात युवकांकडे असते. या माहितीनुसार त्याचा पिंड घडत जातो. त्यामुळेच सोशल मीडियावरून तो निर्भीडपणे प्रतिक्रियाही मांडत असतो. वृत्तवाहिन्यांचा प्रभाव त्याच्यावर पडत असतोच; परंतु माध्यमांच्या व्यवस्थापनातील गोलमाल ओळखण्याइतका तो परिपक्‍व झाला आहे. त्यामुळे खरी बातमी आणि खोटी बातमी यातला भेद युवक जाणतात. पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानात आपल्या वायुसेनेने केलेले हवाई हल्ले यामुळे युवापिढीत मोठे मंथन घडून आले आहे. या घटनाक्रमाच्या आधी युवकांच्या मनात बेरोजगारी हाच प्राधान्यक्रमाचा प्रश्‍न होता.

परंतु पुलवामामध्ये 44 जवान शहीद झाल्यानंतर तसेच त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी दाखविलेले शौर्य पाहून युवकांच्या मनात राष्ट्रवादाची पेरणी पुन्हा एकदा झाली आहे. पूर्वग्रहदूषित लोकांकडून या भावनेला अंध राष्ट्रवादाचे नाव दिले जात असून, ती चूक ठरू शकते. पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणारे पक्ष आणि नेते केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी तसे करीत असल्याची भावना युवकांमध्ये रुजू लागली आहे. सेनादलांच्या पराक्रमावर संशय व्यक्त केल्यामुळे युवकांचे मन बेचैन आहे. राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाचा मुद्दा असून, दहशतवाद आणि देशाच्या आतच असलेला फुटीरतावाद यांना प्रोत्साहन देणाऱ्या देशद्रोही विचारांवर नियंत्रण अपेक्षित आहे.

अशा तऱ्हेने पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रीय चर्चेत जे मुद्दे आले आहेत, ते पारंपरिक निवडणुकीच्या मुद्द्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. त्यामुळे कुटुंबात मान्य असलेल्या राजकीय विचारधारेच्या विरोधात जाऊनसुद्धा युवा मतदार मतदान करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)