तरुणाईमध्ये ट्रेंड होतोय, फुटबॉल वर्ल्ड कप…

सध्या कॉलेज कट्ट्यावर, रेस्टोरंट-कॉफीशॉप मध्ये #MeriDoosriCountri म्हणत अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल, जर्मनी, फ्रान्स अश्‍या देशांना पाठींबा देत, आपलाच आवडता देश कसा चांगला खेळला आणि तो आता विश्वकरंडक कसा जिंकणार.. रोनाल्डो, मेस्सी कसे एकमेकांपेक्षा वरचढ आहेत यावरून एकमेकांत वाद-चर्चा चालू आहेत. कोण सर्वात जास्त गोल मारणार .. अर्जेंटिनाच्या गोलकीपरने त्यादिवशी कशी माती खाल्ली… अश्‍या गोष्टी कळत नसतानाही त्यावर मतं मांडली जातायेत. मैदानावर कधी नव्हे ती पोरं क्रिकेट सोडून फुटबॉल खेळताना दिसतायेत… गोल झाल्यावर रोनाल्डो, नेमार स्टाईलने जल्लोष करतायेत .. केसांची स्टाईल पण त्यांच्यासारखीच ठेवत आहेत. या गोष्टी तुम्ही आजूबाजूला, टीव्हीवर, पेपरमध्ये पाहतच असाल.

पृथ्वीवरचा सर्वात मोठा सोहळा मानल्या जाणाऱ्या फुटबॉल विश्वकरंडकाचा हा परिणाम आहे. जर विश्वकरंडकात पात्र न ठरलेल्या भारतात ही अवस्था आहे तर फुटबॉलची पंढरी मानल्या गेलेल्या ब्राझीलमध्ये तर फुटबॉल प्रेमींचा उत्साह प्रचंड असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खेळाडूंना मोठ्या क्‍लबमध्ये खेळण्याची संधी
चार वर्षातून येणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वकरंडकाची फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. विश्वकरंडकात खेळणाऱ्या खेळाडूसाठी ही एक उत्तम संधी असते आपले कौशल्य जगासमोर दाखवण्याची.. रियाल माद्रिद, बार्सिलोना, मॅंचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल यांसारख्या नावाजलेल्या श्रीमंत फुटबॉल क्‍लब मध्ये खेळण्याची हि एक संधी असते.. विश्वकरंडकात चांगली कामगिरी केली कि मग अश्‍या क्‍लब चे दरवाजे आपोआप उघडतात. हे क्‍लब खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी मोठ्या रकमा मोजण्यास तयार असतात.

राजकीय स्वरूप
खूप जणांसाठी फुटबॉल हा फक्त खेळ नाही तर याहून मोठं काहीतरी होऊन बसला आहे. प्रत्येक सामन्याजनीक होणाऱ्या गोल नंतर लाखो चाहते आनंदी होतात तर तेवढेच दुःखी… सर्व काम सोडून आपल्या आवडत्या संघाला, खेळाडूला पाहायला टीव्हीसमोर बसतात, काही जण सकाळी लवकर उठून तर काही रात्रभर जागून सामने पाहतात. चौकात मोठे पडदे लावून सामूहिकरीत्या सामने पहिले जातात. काही चाहते तर आपल्या संघाला पाठींबा द्यायला रशियात पोहोचाल्लेत.

इराणमध्ये स्रियांना मैदानात जाऊन सामने पाहण्याची परवानगी नाहीये म्हणून इराणच्या स्त्रिया रशियाला पोहोचल्या. मॅक्‍सिकोने जर्मनीविरुद्धच्या सामन्यात गोल नोंदविल्यानंतर चाहत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. इराणने 20 वर्षानंतर प्रथमच विश्वकरंडकात विजय नोंदवला त्यामुळे आनंदी झालेल्या चाहत्यांनी जणू आपण विश्वकरंडकच जिंकला आहे अश्‍या थाटात जल्लोष केला. इराणची विश्वकरंडकातली गोष्ट खूपच रंजक आहे. नाईके या बुटांच्या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीने अमेरिकेन सरकारमुळे इराणच्या खेळाडूंना बूट दिले नव्हते, इराणने सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर नाईकेला उद्देशून “आम्ही तुमच्याशिवायही जिंकू शकतो’ अश्‍या स्वरूपाची टीका केली गेली.

फुटबॉल विश्वकरंडकात राजकारण देखील मागे नाहीये. स्विझर्लंडच्या कोसोवा वंशाच्या खेळाडूंनी स्वीडन विरुद्ध गोल नोंदविल्यानंतर गरुडाची भरारी प्रदर्शित होईल असे हावभाव करत जल्लोष केला, त्यामुळे स्वीडनमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. 2008 मध्ये कोसोवाने स्वीडनपासून वेगळे होत स्वतंत्र देश असल्याची घोषणा केली पण त्याला स्वीडनचीच नव्हे तर भारत, चीन, रशिया या देशांनी मान्यता दिलेली नाहीये. त्यामुळे कोसोवा देशाच्या झेंड्यावरचे चिन्ह असलेल्या “डबल ईगल’ सारखी प्रतिकृतीदर्शक जल्लोष केल्याने स्वीडनमधून चीड तर कोसोवातून समर्थन व्यक्त केल जात आहे.

सर्व देश एकाच पातळीवर

यावर्षी 209 देशांनी विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत भाग घेतला होता त्यातले 32 संघ विश्वकरंडक खेळण्यासाठी पात्र ठरलेत. जागतिक फुटबॉल क्रमवारीत पहिल्या स्थानी असो किंवा शेवटच्या सर्व संघाना आपली पात्रता सिद्ध करावीच लागते. फुटबॉल विश्वकरंडक हा सर्व संघांना समपातळीवर आणतो, त्यामुळेच जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा आइसलॅंड हा देश विश्वकरंडक खेळण्यासाठी पात्र ठरतो तर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे चीन, भारत यांचा साधा उल्लेख केलेला जाणवत नाही, इटली, नेदरलॅंड यांसारख्या सातत्याने चांगलं खेळणारा संघ देखील अपात्र ठरतो.

महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक तारे उदयास येतील… काहींची स्वप्ने पूर्ण होतील अनेकांची तुटतील… खेळाडूंना डोक्‍यावर घेऊन नाचवलं जाईलण.. त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातील तशीच बोचरी टीकाही होईल… रोनाल्डो कि मेस्सी ग्रेट कोण? यावर चर्चा चालूच राहील .. याचा उत्तर कदाचित हा विश्वकरंडक देऊन जाईल… पुढच्या विश्वकरंडकात आपलाही देश असावा हि भावना नकळत जाणवत राहील.. पण काहीही झालं तरी हा विश्वचषक आपल्याला आनंद नक्कीच देईल.

– निशिकांत ठिकेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)