तरी बरं पायात चप्पलच होती…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सुरेंद्र कुंडू नावाच्या माणसाला यंदाचा शौर्य पुरस्कार द्यायला पाहिजे. एअर इंडियाच्या या गड्यानं स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रविंद्र गायकवाड नावाच्या माणसाचा मुकाबला केला. पंचवीस चपला खाल्या, पण गायकवाड यांना सोडलं नाही. भीषण दाढीवाला हा माणूस भारतात वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखा हल्ला करतो की काय? कदाचित, अशी शंका सुरेंद्र कुंडूला आली असावी आणि म्हणून त्याने शिवसेनेच्या या वाघाला डिवचले असावे. कसं आहे? आपण सकारात्मक विचार केला पाहिजे!
खरं सांगायचं म्हणजे 24 मार्चला एअर इंडियाच्या विमानात जो काही प्रकार घडला, तो अनवधानाने घडलाय असं माझं मत आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. रविंद्र गायकवाड आणि एअर इंडियाचा कर्मचारी सुरेंद्र कुंडू यांच्यात बाप-दादापासून शत्रुत्व चालत आलं आहे, असं काहीच नाही. दोघांचा कधी “सामना’ झाला असला, तर तो विमानातच झाला असेल. यामुळे त्यांच्यात शत्रुत्व असण्याचं काहीच कारण नाही.
तरीसुध्दा ही घडना घडली. कदाचित त्यावेळची परिस्थितीच तशी असावी. दिल्लीच्या डोक्‍यावर सूर्य आग ओकू लागला होता. त्यात कहर, म्हणजे प्रा. रविंद्र गायकवाड यांचा लुक-डोळ्यावर काळा चष्मा आणि वाढलेली काळीकुट्ट दाढी. सेनेचे असल्यामुळे भाषासुध्दा शिवराळच असणार. अशात कुणाचाही गैरसमज होणं स्वाभाविक आहे.
नाही तरी, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण हवाई कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनात बसली आहे. गायकवाड यांचा चेहरामोहरा बघून सुरेंद्र कुंडू यांना एखाद्या घातपाताची आली असेल शंका. म्हणून केली असेल विचारपूस. पण त्याचा फटका त्या माणसाला चांगलाच बसला. बिचाऱ्याने 25 चपला खाल्या. आणखीही बरंच काही सहन करावं लागलं असेल.
तरी एक बरं झालं, की गायकवाड यांनी त्या दिवशी पायात चपला घातल्या होत्या. हातात देशी कट्टा वगैरे असता, तर त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याचं काय झालं असतं? विचार करा! शेवटी गायकवाड काही सामान्य माणूस नाही. ते खासदार आहेत. ते सुध्दा सेनेचे! निवडणुकीच्या काळात एका-एका मतासाठी नेते मंडळी हातपाय जोडतात. वाकून चालतात. सगळ्यांना दादा-बापू करतात. पण हे सगळं कसं निवडणुकीपुरतं मर्यादित असतं. निवडून आल्यानंतर तो माणूस खासदार होतो. खासदारांचा रुबाब वेगळाच असतो. तो सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे.
निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कितीतरी नेते मंडळी दलितांच्या घरी जेवण घेतात. याचा अर्थ त्यांनी आजीवन दलिताच्या घरी जेवण घ्यायलाच पाहिजे, असा काही नियम नाही. काही गोष्टी फक्त निवडणुकीपुरत्या मर्यादित असतात आणि निवडणूक जिंकण्यासाठी करायच्या असतात. महाराष्ट्र सदनातील कॅंटिनमध्ये सेनेच्या खासदारांनी जो पराक्रम केला होता, त्यातही गायकवाड यांची भूमिका होतीच. तसं बघितलं, तर गायकवाड यांच्यावर बऱ्याच केसेस आहेत. मात्र, त्यात नवल असं काहीच नाही. ते सेनेचे खासदार आहेत, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
रविंद्र गायकवाड फार प्रभावशाली व्यक्ती आहेत. गायकवाड यांच्या करणीची फळे डॉ. सुनील गायकवाड यांना भोगावी लागत आहेत. एअर इंडिया आणि सीआयएसएफचे कर्मचारी रविंद्रजींचा राग सुनीलजींवर काढत आहेत. त्यांना अकारण त्रास दिला जातो आहे. माझे आडनाव गायकवाड आहे आणि मी खासदार आहे म्हणून काय झालं? त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मला का? असा प्रश्‍न सुनील गायकवाड यांना पडला आहे. जर टेक्‍निकल नजरेतून बघितलं, तर सुनील गायकवाड यांना थोडाफार फटका बसणे स्वाभाविकच आहे. कारण, रविंद्र गायकवाड हे लातूर जिल्ह्यातील जवळपास 110 गावांचे खासदार आहेत. डॉ. सुनिल गायकवाडही लातूर जिल्ह्याचे. रंग लावताना रंग लावणाऱ्याचेही हात रंगतात. नाही का?
म्हणून, रविंद्र गायकवाड यांच्या भीषण लुकमुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा गैरसमज झाला असावा, असं समजून झाल्या गेल्या प्रकारावर माती टाकायला काय हरकत आहे?

 

वंदना बर्वे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)