तरसाच्या त्रासाने कवठे, सुरूर अन्‌ वहागावकर त्रस्त

वनविभागाने तरसाचा बंदोबस्त करण्याची मागणी
कवठे, दि. 1 (प्रतिनिधी) – कवठे, ता. वाई व सुरूर यांच्या शिवहद्दीच्या परिसरात असलेल्या आवळीची पड या शिवारात गेल्या महिनाभर तरस या प्राण्याचा वावर होत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. साधारणत: पाच फुट उंचीचा तरस प्राणी या ठिकाणी फिरत आहे. दोन्ही गावाच्या मधून शिवरस्ता असून या रस्त्याने कवठे तसेच सुरूर या शिवारातील शेतकरी शेतीच्या कामासाठी दररोज ये-जा करीत असतात. तसेच हा रस्ता वहागाव या गावाकडे जाण्यासाठीचा रस्ता असल्याने वहागाव या गावचे ग्रामस्थसुद्धा या रस्त्याने ये-जा करीत असतात. याच शिवारात महामार्गाजवळ श्री शिवाजी विद्यालय सुरूर हे माध्यमिक विद्यालय तसेच एक ज्युनिअर कॉलेज व एक इंग्लिश मीडियम स्कूल या तीन शाळा असून सुुमारे 900 च्या आसपास विद्यार्थी या क्रीडांगणावर खेळाच्या निमित्ताने वावरत असतात. याच परिसरात सदर तरस हा महिनाभर वावरत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तो मानवी अस्तित्व जाणवल्यावर लपून बसत होता. नंतर काही कालावधीने निर्ढावलेल्या या प्राण्याने लोकांच्याकडे दुर्लक्ष करीत रस्त्याने ये-जा करण्यास सुरुवात केली होती व आत्ता जर कोणी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास पाठलाग करण्यापर्यंत या तरसाची मजल गेली आहे. सदर प्राण्यामुळे रात्रीच्या वेळी शेतीस पाणी देण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले असून या परिसरातील तिन्ही शाळेच्या आसपास असलेल्या शेतातून व विशेषतः उसामध्ये या प्राण्याचा रहिवास आहे. या परिसरात असलेल्या कुत्र्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे जाणवत असल्याने बहुदा हा तरस कुत्र्यांची शिकार करीत असावा असा अंदाज परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

तरसामुळे रात्रंदिवस आम्हाला आमच्या जनावरांची चिंता लागून राहिली आहे. तसेच या शाळेमध्ये आमच्यातील विद्यार्थी जात असल्याने कवठे, सुरूर व वहागाव या परिसरातील लोकांच्या जीविताला धोका संभवत असल्याने याबाबत तातडीने वनविभागाने तरसाला पकडावे.
राजेंद्र कोंडीबा पोळ
शेतकरी व दुग्ध संकलक कवठे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)