तरच उद्योजक तयार होतील- रामदास माने

बिझनेस फोकस
उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे, उद्योगांसाठी शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक तयारी होणे खूप गरजेचे आहे. हे केल्यासच उद्योजक तयार होऊ शकतील. उद्योग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहनशक्‍ती लागते. तरुणांना घडलेले उद्योगांमधील यश आणि अपशय या दोन्हींची उदाहरणे देणे गरजेचे आहे. आपल्याकडील तरुण जास्त काळ तग धरत नाहीत. ही परिस्थिती सर्वांनी मिळून बदलायला हवी, यासाठी सरकारने देखील विशेष धोरण राबवणे गरजेचे आहे. तसेच प्रस्थापित उद्योजकांनी देखील पुढकार घेऊन नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन केले पाहिजे, हे मत आहे प्रख्यात उद्योजक आणि उद्योग क्षेत्रात कित्येक कीर्तिमान स्थापित करणाऱ्या रामदास माने यांचे.

संक्षिप्त परिचय
रामदास माने हे कित्येक कंपन्यांचे मालक आहेत. थर्माकोल मशिनरी उतादनात जगभरातील मोजक्‍या बड्या उद्योजकांपैकी एक आहेत, तर भारतातील सर्वांत मोठे थर्माकोल मशिनरी उत्पादक म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते. उद्योग क्षेत्रात त्यांनी कित्येक कीर्तिमान स्थापित केले आहेत, जे मोडणे सध्या तरी शक्‍य दिसत नाही. हा परिचय पाहता रामदास माने म्हणजे कोणत्यातरी मोठ्या औद्योगिक घराण्यात जन्माला आलेले व्यक्‍तिमत्त्व वाटते. परंतु असे बिल्कुल नाही, अठरा विश्‍व दारिद्रय असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या 13व्या वर्षांपासून दोन-सव्वा दोन रुपयांवर मोलमजुरीचे काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्या काळात सर्वसामान्य ज्या पगाराची आणि पदाची कल्पना करू शकत नाही, अशी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज ते आपल्या उद्योगक्षेत्राचे सम्राट आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उद्योग क्षेत्रात कित्येक नव-नवीन अविष्कार करणाऱ्या रामदास माने यांनी रेडीमेड टॉयलेटची संकल्पना खपू पूर्वीच अस्तित्वात आणली. अतिशय स्वस्त दरात 20 हजाराहून अधिक रेडीमेड टॉयलेट्‌स त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर 450 गावांमध्ये बसवले आहेत. माने म्हणतात की स्वच्छतेशिवाय निरोगी आरोग्य शक्‍य नाही. यासाठी कित्येक उपक्रम राबवले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोजगार देणारे व्हा !
रामदास माने हे नेहमीच तरुणांना मार्गदर्शन करतात. दैनिक”प्रभात’शी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, आज महाराष्ट्रात सुमारे 50 लाख तरुण बेरोजगार आहेत. आरक्षण जरी दिले तरी, जास्तीत जास्त एक ते दोन लाख नोकऱ्या निर्माण केल्या जाऊ शकतात. तरुणांनी रोजगार मागण्याऐवजी रोजगार देणारे व्हावे. यासाठी सरकारने पोषक वातावरणाची निर्मिती करायला हवी. नवीन उद्योग सुरू करायचा म्हटला की 40 परवानग्या घ्याव्या लागतात. प्रत्येक विभागात दहा-दहा चकरा मारुन तरुण हतोत्साहित होतात. सिस्टीम ऑनलाईन जरी झाली असली, तरी कुठे ना कुठे अडवणूक केलीच जाते. सरकारने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच अधिकाऱ्यांनी देखील या तरुणांना आपला मुलगा किंवा नातेवाईक उद्योग करण्यासाठी निघाला आहे, असे समजून त्याला मदत करावी, असे झाल्यासच उद्योगाची आणि पर्यायाने आपल्या देशाची भराभराट होईल. तरुणांनी देखील प्रामाणिकपणे सातत्याने कष्ट केल्यास आणि त्यानंतर हतोटी, कसोटी आणि सचोटी जोपासल्यास उद्योजक होणे सोपे जाते. त्यातच आयोजकता, नियोजकता आणि संयोजकता या बाबींवर भर द्यावा, त्यानंतर उद्योजकतेकडे लक्ष द्यावे. या सर्व बाबी सांभाळल्यास उद्योजक नक्‍कीच यशस्वी होतो, असे गुरुमंत्र उद्योजक रामदास माने यांनी दैनिक “प्रभात’च्या माध्यमातून तरुणांना दिले आहेत.

पुनर्वापरावर भर द्यावा
सरकारने पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिक व थर्माकोल पुनर्वापरावर बंदी घातली आहे. हे चांगले आहे, परंतु थोडा विस्तृत विचार केल्यास यातही रोजगाराच्या संधी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजनपूर्वक काम केल्यास रिसायकलिंग उद्योग तयार होतील. यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत.

उद्योगांच्या स्थितीत सुधारणा गरजेची
सध्या 30 टक्‍के उद्योग “स्लो डाऊन फेज’मध्ये आहेत. लोकांची क्रयक्षमता घटली आहे. विशेषतः शेतकरी वर्गाची क्रयक्षमता घटली आहे. शेतकरी वर्गाकडे खरेदीसाठी पैसे आल्यास सर्व उद्योग आणि व्यवसाय जोरात चालतात. उद्योगांची स्थिती सुधारण्यासाठी सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती सुधारणे गरजेचे आहे. काही दुरोगामी निर्णय चुकले आहेत. लोकांकडे पैसे उरले नाहीत, शेतकऱ्यांवर, गोर-गरीबांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्‍त होत आहे. उद्योग तेव्हाच चालतात, जेव्हा देशातील सर्वसामान्यांची स्थिती ठीक असते. यासाठी सर्वप्रथम बेरोजगारी कमी करून क्रयक्षमता असणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)