तमाशासमोर येत्या काळात ‘स्मार्टबॉक्‍स’चे आव्हान

किरण भवरे 

तरीही लोककलेला भरभराटीचे दिवस 


महागाईनुसार यंदा बिदागीत 25 टक्‍क्‍यांनी वाढ

पुणे- जिल्ह्यात अनेक गावांमध्ये यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहेत. यात्रांमध्ये मनोरंजनासाठी तमाशा ही लोककला प्रामुख्याने पाहिली जाते; परंतु बदलत्या काळानुसार स्मार्टबॉक्‍स अर्थात मोबाईल व टीव्हीवर हवे तेव्हा आणि आवडीनुसार मनोरंजनाचा खजिनाच उपलब्ध आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम, वेब सिरीज, युट्यूब, अनेक मनोरंजन वाहिन्यांचे ऍप या माध्यमातून विविध मनोरंजनाची साधणे आपल्या मुठीत आली आहेत. त्यामुळे या मनोरंजनाच्या माध्यमांचे तमाशा फडांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, तरीही मराठी मातीतील तमाशाची दिवसेंदिवस भरभराट होत असल्याचे त्याच्या अर्थकारणातून दिसून येते.

 

तमाशावर मोबाईल, टीव्हीचा परिणाम शून्य आहे. तमाशा ही जिवंत कला आहे. कलाकारांनी सादर केलेल्या वग, गणगौळण, बतावणी याला समाजात चांगला प्रेक्षक आहे. मोबाईल, टीव्हीवर जरी मनोरंजनाची साधने आली असली, तरी तमाशाचे दिवसेंदिवस वाढत जाणारे अर्थकारण पाहता कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही..
-शफी शेख, रघुवीर खेडकर तमाशा फडाचे व्यवस्थापक

तमाशा ही कला महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे अद्यापही तमाशाला पुणे जिल्ह्यात पसंती दिली जाते. ते नारायणगाव येथे तमाशापंढरीत उभारण्यात आलेल्या राहुट्या आणि येथील कोट्यवधींच्या अर्थकारणावरून दिसून येते. नारायणगाव येथे मागील वर्षी 29 तर यंदा 32 राहुट्या उभारल्या. दिवसेंदिवस तमाशाच्या फडांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर यंदा फक्‍त पाडव्याच्या दिवशी विक्रमी 2 कोटी 50 लाखांची बुकींग झाली आहे.
तमाशा पंढरी शौकीनांनी दिवसेंदिवस गजबजत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महागाईनुसार यंदा 25 टक्‍क्‍यांनी बिदागीच्या रक्‍कमेत वाढ झालेली आहे. कलाकारांचे मानधन, डिझेल, वाहतूक तसेच सर्व मॅनेजमेंटसाठी रक्‍कम दरवर्षी वाढवून मिळत आहे. पुणे जिल्हा आणि अवघ्या राज्यात तमाशाचा फड घेऊन फिरावे लागत आहे. त्यामुळे महागाईनुसार आणि आमच्या मागणीनुसार सध्या तरी बिदागी मिळत आहे.

आर्केस्ट्रा हा तमाशाला स्पर्धक नाही -शेख
आर्केस्ट्राच्या खेळाचे सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. त्यामुळे तमाशाला आर्केस्ट्रा हा स्पर्धक ठरत आहे का? यावर रघुवीर खेडकर तमाशा फडाचे व्यवस्थापक शफी शेख म्हणाले की, आर्केस्ट्रामध्ये कलाकारांची संख्या कमी असते. मात्र, तमाशात कलाकारांची संख्या अधिक असते. त्यामुळे आर्केस्ट्राची सुपारी अथवा बिदागी तमाशाच्या तुलनेत कमी असते. मात्र, मागच्या वर्षी आम्हाला मिळालेल्या 2.50 लाखांच्या तुलनेत यंदा अधिक बिदागी मिळाली आहे. तसेच कार्यक्रमांचे बुकींगही चांगले आहे. त्यामुळे आर्केस्ट्रा आमचा स्पर्धक होतोय, याबाबत मी सहमत नाही.

तमाशाला लोकाश्रय भक्‍कम, राजाश्रयाची गरज
लोककला वाढली, जपली पाहिजे यासाठी शासनाने तमाशा कलावंतांच्या पाठिशी भक्‍कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. प्रेक्षकांची संख्या अद्यापतरी घटताना दिसत नाही. त्यामुळे तमाशाला लोकाश्रय भक्‍कम आहे. मात्र, राजाश्रयाची गरज आहे. महाराष्ट्राच्या लावणीने आपले स्थान ही भक्‍कम केलेले आहे. मात्र, शासनाने आर्थिक स्वरुपात भरीव मदत करण्याची अपेक्षा तमाशा फडमालक करीत आहेत.

अकलूजचा लावणी महोत्सव बंद झाल्याने फटका
अकलूज हे लावणी कलावंतांचे माहेरघर समजले जाते. मात्र, पुढच्या वर्षीपासून येथे लावणी महोत्सव भरवला जाणार नसल्याने आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या स्पर्धा बंद होत असल्याने अनेक लावणी कलावंत दुःख व्यक्‍त करीत आहेत. कारण या स्पर्धेतून अनेक कलावंत घडले आहेत. तसेच ही स्पर्धा बंद होत असल्याने हक्‍काचे व्यासपीठ ही पुढील वर्षापासून नसणार असल्याने फटका बसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)