गणेश धनावडे अखेर जेरबंद
महाबळेश्वर – महाबळेश्वरसह विविध पोलीस ठाण्यात चोरीचे तब्बल 23 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गणेश विष्णुदास धनावडे (वय 22, रा. करंजे तर्फ मेढा, ता. जावली) याला महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची सातारा कारागृहात रवानगी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सौरऊर्जा बॅटरी चोरीच्या गुन्ह्यात गेली दोन वर्षांपासून गणेश विष्णुदास धनावडे हा फरारी होता. अनेकवेळा शोध घेऊन देखील त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. गणेश धनावडे हा सराईत आरोपी शिरवळ येथील एका खासगी कंपनीत नाव व गाव बदलून काम करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली.सलग दोन दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते. गणेश हा सध्या मेढा येथे लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.

या माहितीवरून महाबळेश्वरचे सहाय्यक फौजदार डी. एच. पवार व पोलीस हवालदार चंद्रकांत तिटकारे यांनी त्याला राहत्या घरातून उचलले. त्याच्यावर महाबळेश्वरसह विविध पोलीस ठाण्यात चोरीचे 23 गुन्हे दाखल असून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याची सातारा कारागृहात रवानगी करण्यात आली. या सराईत आरोपीस शिताफीने पकडणाऱ्या सहाय्यक फौजदार डी. एच. पावरा व पोलीस हवालदार चंद्रकांत तिटकारे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे बक्षिसासाठी शिफारस केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)