तब्बल 140 कुटुंब आणि 100 एकराची भागणार तहान

पिंपरी – स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मावळ तालुक्यातील परितेवाडी हे गाव मुबलक पाण्यापासून वंचित आहे. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूत गावक-यांची पाण्यासाठी पायपीट दरवर्षी ठरलेली असायची. त्यामुळे गावात शिक्षणाचा दर चांगलाच खालावलेला आहे. गावावरील हे पाणी संकट दूर करण्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने कंबर कसली आहे. गावक-यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी गावापासून सुमारे तीन किलोमीटर लांब असलेल्या टाटा डॅम वरून पाईप लाईन आणण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात पाईप लाईनचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर यांनी दिली.

पाईप लाईनच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी माजी अध्यक्षा जयश्री कुलकर्णी, रेखा मित्रगोत्री, मावळ विकास समितीचे बबनराव बधाळे, परितेवाडीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. परितेवाडी गावाची तहान भागविण्यासाठी एक पंपसेट व सुमारे तीन किलोमीटर लांबीची पाईप लाईन करण्यात येणार आहे. या कामामुळे गावातील 140 कुटुंब व 100 एकर शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.

परितेवाडी हे गाव पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीमध्ये देखील हंगामीच पिके घेतली जातात. पावसाळ्यानंतर शेतीत कसलेही शेती उत्पादन होत नाही. त्यामुळे गावावर आर्थिक संकट कायम वास्तव्याला असते. पावसाळा सोडता अन्य दिवसात पाण्यासाठी वणवण ठरलेली असते. शाळेत जाण्याच्या वयात मुलांवर पाण्याची भांडी घेऊन फिरण्याची वेळ आल्याने गावात शाळेची गळती मोठ्या प्रमाणात आहे.

गावाच्या अविकासाला व मुलांच्या शाळेपासून वंचित होण्याला केवळ पाणी हेच कारणीभूत असल्याने पाण्याची सोय करणे महत्वाचे आहे. त्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पुढाकार घेत पाईप लाईनचे काम हाती घेतले आहे. हे काम पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. गावात पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी आल्यानंतर गावकरी बारा महिने शेतीतील विविध पिके घेऊ शकणार आहेत. त्यामुळे गावावरील आर्थिक संकट टळेल, अशी आशा इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)