तब्बल 124 शाळांना बकाल स्वरुप

पाटण तालुक्यात शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : पदाधिकार्‍यांनाही पडलाय कामाचा विसर
सुर्यकांत पाटणकर
पाटण, दि. 17 -तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या अवस्था दयनीय झाली आहे. प्राथमिक शाळांना बकाल स्वरुप आल्याने विद्यार्थ्यांची परवड सुरु आहे. शाळांच्या छतांना लागलेली गळती, भिंतीवरुन पाझरणारे पाणी, पावसामुळे ओल्या झालेल्या जमिनी तर कंपाऊड नसल्याने मोकाट जनावरांचा वावर यामुळे तालुक्यातील 124 शाळांना बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मागून ही शिक्षण विभागाचे होणारे दुर्लक्ष यामुळे शाळा की जनावरांचा गोठा? असा प्रश्न पालकांना पडत आहे.
तालुक्यातील या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मिळणारा निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दरवर्षी प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात येते. यावर्षी 124 शाळांच्या 197 शाळा खोल्यांसाठी सुमारे 5 कोटी 38 लाख साठ हजार एवढ्या निधीची मागणी करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सर्वच प्राथमिक शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. परंतु या शाळांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. शाळांच्या दर्जा खालावत गेल्यानंतर पटसंख्या कमी होवू लागते. पटसंख्येआभावी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला. यातून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापन समिती शिक्षक केंद्रप्रमुख लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत मिळणार्‍या निधीतून शाळांना पायाभूत सुविधा देण्यात आल्या. सुविधांबरोबर शिक्षणही चांगले मिळू लागल्यानंतर पालकांचा ओढा पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वाढला. परिणामी शाळांच्या पटसंख्येत समाधानकारक वाढ झाली.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पायाभूत सुविधा देताना सर्वशिक्षा अभियान व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून एक समान निधीचे वाटप करण्यात येत नाही. तर शाळांच्या निधी वाटपात ही राजकारण होत असल्याचा आरोप करण्यात येतो. परिणामी प्रत्येक वर्षी प्रस्ताव पाठवूनही निधी मिळत नसल्याची खंत शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सभापतीपद पाटणला मिळविण्यासाठी मोठी ताकद लावली होती. जिल्ह्यात मातब्बर मंडळी या पदावर डोळा ठेवून असताना विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाटण तालुक्याला न्याय मिळेल, या भावनेतून तालुक्याला संधी ही मिळाली. परंतु विकासाच्या नावाखाली केवळ टक्केवारी लाटण्याचे काम या विभागात होताना दिसत आहे. पदामुळे जनतेच्या विकास कामांचा विसर कसा पडतो. याच उत्तम उदाहरण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या 124 शाळांच्या 197 वर्ग खोल्यांची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. या शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा मिळण्यासाठीचा प्रस्ताव, दुरुस्तीसाठी लागणारा निधी यासाठी 5 कोटी 38 लाख साठ हजार एवढ्या रक्कमेची मागणी केल्याचे शिक्षण अधिकारी राजकुमार निकम यांनी सांगितले.

पाटण तालुका डोंगराळ व दुर्गम असून पावसाचे प्रमाण जास्त असते. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यात 532 प्राथमिक शाळांपैकी बहुतांश शाळांना पावसाळ्यात गळती लागते. दुरुस्तीसाठी प्रत्येक वर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रस्ताव पाठवून निधी मागितला जातो. मात्र, पुरेसा निधी येत नसल्याने दुरुस्ती करता येत नाही.
राजकुमार निकम,
गटशिक्षण अधिकारी, पाटण.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)