तपास यंत्रणेच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे 

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरण : अटक आरोपींवर लक्ष देण्यापेक्षा फरार आरोपींचा शोध घ्या

मुंबई – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या दोन्ही तपास यंत्रणांच्या तपासावर उच्च न्यायालयाने तिव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात केवळ संशयीत म्हणून अटक केलेल्या आरोपींवर लक्ष केंद्रीत करून तपास करण्याऐवजी फरार-मोकाट असलेल्या आरोपींचा शोध घ्या. त्यांच्या तपासाबाबत काय केले ते सांगा, असे बजावताना न्यायालयाने सीबीआयच्या अंतर्गत यादवीचाही परामर्श घेतला.

देशात सीबीआय ही सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणून ओळखली जाते. या प्रकरणाचे गांभीर्य त्यांनी ओळखले पाहिजे. भारतात सध्या काय चालले आहे, त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. आपल्या देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य असले तरी आपल्या संविधानिक तत्वांशी योग्य पध्दतीने अंमलबजावणी होते की नाही हेही पाहण्याची गरज आहे, असे मतही न्यायालयाने सीबीआयच्या अंतर्गत वादावर व्यक्त केले.

पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी दोन्ही तपास यंत्रणांनी अहवाल सादर केला. दाभोलकर हत्याकांड प्रकरणी युएपीएअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्याने त्या दृष्टीने सध्या कारवाई सुरू असल्याचे सीबीआयच्यावतीने अतिरिक्त सॉलीसीटर जनरल अनिल सिंग यांनी स्पष्ट केले. तर पानसरे हत्याकांड प्रकरणी दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अमोल काळे या आरोपीचा कर्नाटककडून ताबा मिळाला असल्याने तपास सुरू आहे. त्याच्या चौकशीतून नवीन काही माहिती मिळण्यावर पुढील तपास अवलंबून असल्याचे एसआयटीने स्पष्ट केले. तर कामाचा ताण असल्याचेही दोन्ही तपास यंत्रणांनी सांगितले.

याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. अशा संवेदनशील प्रकरणात असा संथ तपास अपेक्षित नाही. दोन्ही प्रकरणात तपासासाठी खास पथके कार्यरत आहेत. त्यामुळे कामाचा ताण त्यांच्यावर असणे अपेक्षित नाही, असे मत व्यक्त करताना केवळ अटक केलेल्या आरोपींवर लक्ष्य ठेवून पुढील तपास करण्यापेक्षा जे फरार म्हणून तुमच्या दप्तरी नोंद आहे, अशा मोकाट असलेल्या आरोपींकडे लक्ष केंद्रीत करा, असे खडेबोल सुनावत याचिकेची सुनावणी 14 डिसेबरपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)