तपास यंत्रणांना न्यायालयाने फटकारले

प्रकरण न्याय प्रविष्ट असताना माध्यमांसमोर पुरावे कसे काय उघड करतात


दाभोलकर-पानसरे कुटुंबियांवरही ओढले ताशेरे

मुंबई – कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तपास अधिकारी माध्यमांसमोर पुरावे कसे काय उघड करतात, असा सवाल उपस्थित करून प्रसार माध्यमांसमोर जाणाऱ्या तपास यंत्रणांसह दाभोलकर-पानसरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले.

असला प्रकार आम्ही खपून घेणार नाही, अशा शब्दांत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रसार माध्यमासमोर जाणाऱ्या दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये असे खडेबोल सुनावले.

हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तपास यंत्रणा आणि हत्या झालेल्या कुटूंबातील व्यक्ती प्रसार माध्यमांसमोर पुरावे आणि मत व्यक्त करत असल्याने न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी कुलाबावाला यांच्या खंडपीठाने तिव्र नाराजी व्यक्त केली.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी या दोन्ही प्रकरणांत सीबीआय आणि एसआयटीने आपल्या तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयात सादर केला.

दाभोलकर प्रकरणात हत्याप्रकरणात सीबीआयने मारेक-यांना ताब्यात घेतले असून एटीएसच्या ताब्यातील काही आरोपींचीही कस्टडी मिळवली असल्याची माहीती अरितिक्त सॉलीसीटर जनरल अनिल सिंग यांनी दिली. यावेळी प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या सखोल माहितीबाबत न्यायालयाने तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दाभोलकर प्रकरणातील सध्याचे अटकसत्र सुरू होण्याच्या अगोदर जी नावे न्यायालयासमोर आली होती त्याचे काय झाले? असा सवाल उपस्थित केला. आता अटकेत असलेले आरोपी तेच आहेत ना? अन्यथा खरे आरोपी बाहेर मोकाटच राहतील, अशी शंका व्यक्त केली.

स्वतंत्र तपास सुरू ठेवा
एसआयटीच्या वतीने दाभोलकर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना पानसरे हत्या प्रकरणात काही दिवसांनी ताब्यात घेणार असल्याचे ऍड. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले. यावेळी दुसऱ्या तपास यंत्रणांवर अवलंबुन राहू नका. या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, असे बजावताना तपास अधिका-यांनी माहिती आणि पुरावे जाहीर करताना काळजी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)