तणाव निवारण्याचे काही उपाय

स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही महत्त्वाचे आहात हे लक्षात ठेवा. पौष्टिक आहार घ्या.शरीराचा ताण हलका करण्यासाठी गरम किंवा थंड जसे तुम्हाला सहन होईल त्या पाण्याने अंघोळ करा. तुमच्या मनाप्रमाणे दुकानात जाऊन खरेदी करा.

लोकांमध्ये मिसळा. धार्मिक किंवा सामाजिक समारंभामध्ये भाग घ्या. शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा. दुसऱ्यांना सुख, आनंद, समाधान, देण्याचा प्रयत्न करा जुन्या सवयी बदलून काही नवीन आणि चांगल्या सवयी लावून घ्या. त्यामुळे तुमची मानसिक आणि भावनिक प्रगती होईल.एखादा नवीन छंद लावून घ्या. चांगली पुस्तके वाचा. चांगले संगीत ऐका.

पुरुष सहसा रडत नाहीत. रडणे हा कमीपणा वाटतो; परंतु मोकळेपणाने रडायला काही हरकत नाही. रडण्याने मन मोकळे होते. ताण हलका होतो तुम्ही अंथरुणावर पडून असाल आणि बाहेर जाता येत नसेल तर पलंगाजवळ फोन ठेवा. मित्रांशी नातेवाईकांशी फोनवरून बोला. म्हणजे एकटेपणा वाटणार नाही

दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस मन उदास असेल तर सावध राहा. अन्नावर वासना नसेल, शांत झोप लागत नसेल, निराश वाटत असेल, विस्मरण होत असेल, अस्वस्थ वाटत असेल, नेहमीपेक्षा जास्त थकवा येत असेल तर ही लक्षणे औदासीन्याची म्हणजे डिप्रेशनची आहेत. ताबडतोब डॉक्‍टरांचा किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

आपल्या दैनंदिन आयुष्याचं निरीक्षण करा. कोणत्या जास्त महत्त्वाच्या वाटतात ते ठरवा. अनावश्‍यक वाटणाऱ्या गोष्टी कटाप करा. बरीचशी रोजची कामे तुम्हाला आवश्‍यक आहेत असे वाटते, पण ती खरोखरच तशी आहेत का? ती कामे फक्‍त तुम्हालाच महत्त्वाची वाटतात.तुम्हाला आरामात बघणे घरातल्यांना, मित्रांना, नातेवाईकांना आवडते.

मग उगीचच कारण नसताना निरुपयोगी कामात बिझी राहण्याचा प्रयत्न कशाला करायचा.काही थोडीच कामे करा, पण चांगली करा. कुणाची मदत लागली तर मोकळेपणाने मागा.आणि त्यांचे आभार माना.तुम्हाला मदत करण्याचे समाधान त्यांना मिळू द्या.

तुमच्या अंगात उत्साह आणि ताकद असली की तुम्ही सहाजिकच काम आणि कष्ट जास्त करता, पण ताकद कमी झाली असेल तर रोजच्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी पूर्वीसारख्या व्हायला हव्यात, असा आट्टाहास धरू नका. ऊर्जेची बचत करा. आहे ती ऊर्जा योजनापूर्वक आणि आवश्‍यक कामासाठी वापरा. दिवसभराचे वेळापत्रकच ठरवा.
जास्त तणावाचे आणि कष्टाचे काम असेल तर ते सकाळीच करा.
विश्रांतीच्या वेळा ठरवा आणि थकून जाण्यापूर्वीच विश्रांती घ्या.
एखादे कष्टाचे काम आणि नंतर एखादे हलके काम असा क्रम ठरवा. सतत एका नंतर एक कष्टाची कामे करू नका.

घरातली कामे आणि बाहेरची कामे यांच्या वेळा ठरवा. त्यामुळे वेळेची व ऊर्जेची बचत होते
कमी वेळात पूर्ण होणाऱ्या कामची आखणी करा. एखादे काम कमी वेळात पूर्ण होणारे असेल तर ते काम हाती घ्या.ते वेळेत पूर्ण झाले की मनाला समाधान वाटते. काम पूर्ण केल्याचा आनंद वाटतो.अशा लहान लहान कामाची आखणी करा. या कामामध्ये घरच्यांना किंवा मित्रानाही सामील करून घ्या.

तणाव जाण्यासाठी काहीजण झोपेची गोळी घेतात किंवा मद्यपान करतात.त्याने तात्पुरते बरे वाटत असले तरी तो तणावमुक्‍तीचा उपाय नव्हे. शिवाय झोपेच्या गोळीची सवय लागते. काही दिवसांनी एका गोळीनं झोप येत नाही म्हणून दोन गोळ्या घ्याव्या लागतात. मग त्याचे व्यसनच लागते आणि ते शरीराला हानीकारक आहे. तसेच मद्यपानाचे आहे. त्याची एकदा का सवय लागली की पैसा आणि आरोग्य यांची नासाडी होते. आणि मुख्य म्हणजे ताणापासून मुक्‍ती होण्यासाठी हे प्रयत्न असतात तो ताण तसाच राहतो. तो कमी तर होतच नाही शिवाय या व्यसनाचा त्रास वाढतो. म्हणून वेळीच सावध व्हा.

आनंदाचे क्षण शोधा. खेळण्यासाठी वेळ राखून ठेवा. मोकळेपणाने हसता येईल असे अंताक्षरी किंवा विनोदी किस्से सांगण्याची स्पर्धा अशासारख्या खेळात भाग घ्या. हसण्याने जादूसारखा परीणाम होतो.तुम्ही कितीही दु:खी असलात तरी हसण्याने एका क्षणात मूड बदलतो. हसण्याने सगळं जगच सुंदर दिसायला लागतं. हसण्याने ताण नाहीसा होतो.मित्रांसोबत विनोदी चित्रपट बघा. नाटक बघा. तुम्हाला आनंद वाटेल अशा गोष्टी शोधा आणि त्यात भाग घ्या

तुम्ही जग बदलू शकत नाही. पण स्वत:ला मात्र नक्कीच बदलू शकता हे लक्षात ठेवा.घरामध्ये पत्नी, मुले, आई-वडील आणि बाहेर मित्र यांच्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता. पण त्यांचे स्वभाव वेगळे असतात, त्यांची मते वेगळी असतात. त्यांचे दृष्टिकोन वेगळे असतात.

प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्हाला त्यात बदल करण्याचा कोणताही हक्क नाही आणि तसे करण्यात तुम्हाला यश तर येणार नाहीच उलट ताणच वाढेल. म्हणून शांत राहा. शांत रहाण्याचे तंत्र शिकून घ्या.सायकल जशी शिकावी लागते तसेच शरीर आणि मनाला शांत कसे ठेवायचे हेही शिकावे लागते.एकदा का ते समजले की मग ती सवयच होऊन जाते.

मन आणि शरीर विश्रांत करण्याची एकच एक पध्दत सगळयांना लागू पडेल असे नाही.खाली दिलेले उपाय करून बघा. त्यात तुम्ही सुधारणाही करू शकता. जो उपाय योग्य वाटेल तो नियमितपणे करा.

विश्रांत होण्याचे तंत्र
यासाठी दिवसातली एक ठराविक वेळ राखून ठेवा. घरातली एक शांत जागा शोधा. टीव्ही, मित्र, नातेवाईक, घरातली माणसे यापासून त्या क्षणापुरते दूर राहा.
डोळे मिटा. शरीरातले कोणते स्नायू तणावठास्त आहेत, आखडलेले आहेत याचा मनानेच शोध घ्या. हे स्नायू मनानेच आणखी आखडून घ्या आणि एकदम सैल सोडा. मान व पाठ यापासून सुरुवात करा आणि खाली पायापर्यंत जा. संपूर्ण शरीर सैल होईल. तणावमुक्‍त होईल.

दुसरी एक पद्धत अशी आहे- आरामशीर खूर्चीत बसा. दोन्ही पायाचे तळवे जमिनीला टेकवा. दोन्ही हात सैलपणे सोडून द्या. मग दीर्घ श्‍वास घ्या. स्वत:चे नाव घ्या. म्हणा ”मी अमुक अमुक” मग श्‍वास सोडतांना म्हणा ”मला आता चांगले वाटत आहे” श्‍वास सावकाश घ्या आणि सोडा. प्रत्येकवेळेस वरील वाक्‍य म्हणत राहा.

मग शरीराचा प्रत्येक अवयव डोळ्यासमोर आणून ”माझी मान मोकळी झाली आहे” ”माझी पाठ मोकळी झाली आहे” असे म्हणत म्हणत पायापर्यत जा. संपूर्ण शरीर तणावमुक्‍त होईल आणि मनावरचा ताणही नाहीसा होईल.

तिसरी एक पद्धत अशी आहे- खाली बसा किंवा खूर्चीत बसा. नजरेच्या पातळीवर येईल अशी एक मेणबत्ती समोर ठेवून ती पेटवा.ज्योतीकडे टकलावून बघा.काही मिनिटांनी डोळे बंद करा आणि मिटलेल्या डोळयासमोर येणाऱ्या प्रकाशाच्या वर्तुळांकडे शांतपणे बघा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)