तणाव कमी करण्यासाठी आपली आवड, छंद जोपासा

किशोर काळोखे यांचे आवाहन
नीरा -बदलत्या प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता प्रत्येकाने स्वतःच्या अंगात निर्माण करणे गरजेचे असून दररोजचे व्यवहार करताना आपली आवड, छंद जोपासल्यास ताण तणाव कमी होतात. बदलती जीवनशैली, धावपळ यांमुळे वाढत जाणारा ताण-तणाव जनसामान्यांच्या आयुष्यातील प्रमुख समस्या बनत आहे. आपण दिवसभरात हजारो वेगवेगळे विचार करतो. वाईट विचारांनी मनाची अस्वस्थता वाढते. त्यामुळे योग्य व विधायक विचार ताण तणाव कमी करण्यास मदत करतात, असे प्रतिपादन किशोर काळोखे यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर) येथील रयत संकुलातील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिरात आयोजित व्याख्यानात ‘ताण तणावांचे व्यवस्थापन’ या विषयावर काळोखे बोलत होते. सातारा जिल्ह्यातील आई फाउंडेशन मार्फत आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काळोखे पुढे म्हणाले, पालकांनी मुलांच्या विचारांची क्षमता जाणून घेणे गरजेचे आहे. जास्तीचा ताण विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम करीत असतो. अशा वेळी मुलांचे मित्र बनून त्याच्या भावविश्वात पालकांनी स्थान निर्माण करायला शिकले पाहिजे. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांचेही खूप महत्व आहे. मुलांनी ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायला हवे. मुलांच्यात वाढत्या वयाबरोबर अस्वस्थता येते. अशावेळी थोरामोठ्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करायला हवे. परिस्थितीशी झगडण्याची क्षमता याच वयापासून वाढीस लागते. त्यामुळे मुलांनी तणावात न जगता प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकावे.
वसंतलाल गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतलाल गांधी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सुहासिनी चव्हाण, रेखा चव्हाण, रेणुका कोठाडीया, प्रा. माने उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका शुभांगी पंडीत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पर्यवेक्षक उत्तम काळे व ज्ञानेश्वर जाधव यांनी सहकार्य केले. यावेळी 700 विद्यार्थिनी, 150 पालक व 50 शिक्षिका उपस्थित होत्या. सविता मदने यांनी सूत्रसंचालन केले तर सुनंदा साळुंखे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)