तणावपूर्ण शांततेत 140 अतिक्रमणांवर हातोडा

पिंपरी – अख्ख्या शहराचे लक्ष लागलेल्या भोसरीतील बहुचर्चित अतिक्रमणांवर अखेर महापालिकेने आज हातोडा टाकला. चोख पोलीस बंदोबस्तात सुमारे 140 छोटी-मोठी दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षानंतर राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाने मोकळा श्‍वास घेतला आहे. आजपर्यंतची भोसरीतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील परिसर अतिक्रमणांनी अक्षरशः गिळंकृत केला होता. त्यामुळे शंभर कोटी खर्चून हा पूल उभारल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. आजी-माजी आमदारांचा राजकीय वरदहस्त असल्याने महापालिका कारवाईला धजावत नसल्याचा आरोप होत होता. अखेर महापालिकेने कारवाईचे धाडस दाखविले. काल (गुरुवारी) अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच पोलीस फौजफाटा जमायला सुरूवात झाली होती. परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, तीन उपनिरीक्षक 50 पोलीस कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे 30 कर्मचारी 55 बिट निरीक्षक, 10 कनिष्ठ अभियंता, 5 उपअभियंता,56 बिट निरीक्षक, 12 मनपा पोलीस कर्मचारी, याशिवाय अग्निशामक विभागाची एक गाडी, रुग्णवाहिका, सात जेसीबी, क्रेन व तीन डम्पर हा असा मोठा लवाजमा तैनात करण्यात आला होता.

धावडेवस्ती ते अंकुशराव लांडगे नाट्यगृह व भोसरी बस टर्मिनलपर्यंत सुमारे 140 अनधिकृत दुकाने थाटण्यात आली होती. आज (शुक्रवारी) सकाळी दुपार पर्यंत सगळी अतिक्रमणे काढून घेण्यात यावीत असे सांगण्यात आले होते. दुपारी तीननंतर मोठ्या बंदोबस्तात सर्व अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता एस आर चौरे, खरात संजय, शाखा अभियंता किरण अंदुरे, अभय कुलकर्णी आदींनी कारवाई करण्याकरिता पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)