तडजोडीबाबत अरुण जेटलींशी चर्चा झाली होती – विजय मल्ल्या

लंडन – कोट्यवधी रुपयांच्या कर्जबुडवेगिरी आणि आर्थिक अफरातफरप्रकरणी वादाच्या भोवऱ्यातील मद्यसम्राट विजय मल्ल्याने आपण तडजोडीसंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट केला आहे.

आतापर्यंतची सर्व देणी संपवून टाकण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असे मल्ल्याने म्हटले आहे. मल्ल्याविरोधात लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयामध्ये प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी मल्ल्या उपस्थित राहिला होता. त्यादरम्यान न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांनी छेडले असता मल्ल्याने हा गौप्यस्फोट केला आहे.

या सुनावणीदरम्यानच वेस्टमिन्स्टर न्यायालयाकडून मुंबई कारागृहातील तयारीचे व्हिडीओही तपासले जाण्याची शक्‍यता आहे. विजय मल्ल्याला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेच त्याची जामिनावर सुटका झाली होती. न्यायालयाबाहेर पत्रकारांनी छेडले असता, “प्रत्येकालाच देणी संपवण्याची संधी मिळते. त्याबाबत न्यायालयच निर्णय घेईल.’ असे उत्तर मल्ल्याने दिले.

आपण आणि युनायटेड ब्रिवरीज ग्रुपने कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये 22 जुन 2018 रोजी तडजोडीचा प्रस्ताव दिला होता. सुमारे 13,900 कोटी रुपयांच्या आपल्या मालमत्तेच्या आधारे ही तडजोड केली जावी असा प्रस्ताव होता. ही मालमत्ता न्यायालयाच्या देखरेखीखाली विकण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. या विक्रीतूनच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसह अन्य कर्जदारांची देणी दिली जावीत, असे सुचवण्यात आले होते, असे मल्ल्याने सांगितले.

लंडनच्या न्यायालयामध्ये गेल्या वर्षी 4 डिसेंबरपासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणाविषयीची सुनावणी सुरू झाली. त्यामध्ये मल्ल्याविरोधात सकृतदर्शनी गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणामध्ये कोणताही अडथळा नसावा आणि मल्ल्यावर भारतात पारदर्शकपणे खटला चालवला जाण्याची हमी दिली गेली आहे.

एका अन्य प्रकरणामध्ये भारतातील 13 बॅंकांना मल्ल्याकडून 1.145 अब्ज पौंडांची वसूली करण्याचा अधिकार असल्याच्या निर्णयाला मल्ल्याने दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळून लावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)