“तक्रार पेटी’ मूळ उद्देशापासून “रिकामी’

शर्मिला पवार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या सोसायट्या व तेथील नागरीकरण पाहता पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढविण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोसायटी व शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या तीन महिन्यांत तक्रार पेटींना अवघा दहा टक्‍के प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे सोसायट्यांमधील उणी-दुणी काढणाऱ्या तक्रारींचा त्यामध्ये समावेश असल्याने या उपक्रमाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.

महिलांनी, विद्यार्थिनींनी त्यांच्या समस्या या पुढे येवून बिनधास्तपणे मांडाव्यात, त्यांना कसली भिती राहू नये यासाठी आयुक्तांनी हा उपक्रम हाती घेतला होता. यामध्ये निनावी तक्रार दिली तरी पोलीस त्याची दखल घेत होते. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दहा अशा सुमारे 100 तक्रार पेट्या देण्यात आल्या होत्या. ज्या शाळांमध्ये व सोसायटीमध्ये तक्रार पेट्या बसवल्या गेल्या. यामध्ये पोलीस जेव्हा ही तक्रार पेटी संबंधीत परिसरात लावत त्यावेळी त्या शाळेची व सोसायटीची बैठक घेतली जात असे. यामध्ये तक्रार पेटीची माहिती व त्याचा वापर कसा व का करावा याची माहिती पोलीस देत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तक्रार पेट्यांचा भर हा मुख्यत्वेतरुन वाकड, चिंचवड, निगडी, सांगवी, रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, मोशी अशा परिसरात केला गेला. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्थाचा सामावेश होता. सुरुवातीला सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे व पोलीस आयुक्तांचे कौतुक केले होते. मात्र नागरिकांनी या तक्रार पेटींना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. यामध्ये गेल्या सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत केवळ 30 ते 40 तक्रारी आल्या. काही पोलीस ठाण्यात ही संख्या केवळ 10 आहे. त्यामुळे पोलिसांना जे अपेक्षीत होते ते नागरिकांपर्यत पोहचले नसल्याचे चित्र आहे.

वाकड परिसरात 110 गृहनिर्माण संस्था आहेत तर चिंचवड मधील संख्या 265 च्या घरात आहे. त्यामुळे पोलिसांना तीन महिन्यांत या पेट्या सर्वच गृहनिर्माण संस्थापर्यंत पोहचवता आल्या नाहीत. सध्या पेट्या आयुक्तालयाकडे जमा करण्यात आल्या आहेत. मुलींनी व महिलांनी त्यांच्या घरातील, शाळेतील तक्रारी मांडाव्यात. त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत निनावी माहिती दिली तरी त्याबाबत गंभीर दखल घेतली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी तक्रार पेटीची घोषणा करताना सांगितले होते. मात्र अद्याप तशी तक्रार पेटीत पडलेल्या नाहीत. त्या ऐवजी पार्कींग, सोसायटीमधील दोन गटांतील भांडणे, शाळेतील पाण्याच्या समस्या अशा तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या.

तक्रार पेटीची संख्या वाढविण्याची गरज
पोलीस व नागरिकांच्या अनुभवानुसार उपक्रम उत्तम आहे. मात्र तक्रार पेटींची अत्यल्प संख्या व जनजागृतीचा अभाव यामुळे तक्रार पेटीला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शहराची लोकसंख्या 20 लाखांपेक्षा अधिक असून तक्रारपेट्यांची संख्या 100 आहे. त्यामुळे अनेक शाळा व सोसायटींपर्यत त्या पोहचल्या नाहीत. तसेच तक्रार पेट्यांच्या कमी संख्येमुळे ज्या ठिकाणी त्या ठेवल्या होत्या तेथे त्या केवळ आठ दिवस ठेवल्या जात
होत्या. त्यामुळे नागरिकांना त्यांचा योग्य तो वापर करता आला नाही, असे महापालिकेचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी सांगितले.

तक्रार पेटीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांना याची पुरेसी माहिती नसल्यामुळे केवळ 10 टक्‍केच प्रतिसाद मिळाला. मात्र प्रतिसाद कमी असला तरी हा उपक्रम बंद न करता त्यात सुधारणा करत तो तसाच कायम ठेवला जाणार आहे. नागरिकांनी त्यांच्या मनातील भीती घालवत पुढे यावे व तक्रारी मांडाव्यात. विशेषतः महिलांनी यात पुढाकार घ्यावा. यामध्ये त्यांचे नाव कोठेही उघड केले जाणार नाही.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)