तक्रारीनंतर “यशोदीप’कडून ठेवीदाराचे पैसे परत

मायणी – माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि त्यांच्या यशोदीप पतसंस्थेला अखेर ठेवीदार दीपक साळुंखे यांना जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दिलेल्या निवाड्यानुसार मुदत ठेवीची रक्कम अदा करावी लागली.पतसंस्थेच्या वडुज येथील इमारतीचा लिलाव सुरू होण्याआधी संस्थेमार्फत साळुंखे यांना सुमारे साडेबारा लाख रुपये देण्यात आले.
याबाबतची माहिती अशी, मायणीतील दीपक साळुंखे व प्रताप साळुंखे या दोघांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर संस्थापक असलेल्या यशोदीप पतसंस्थेत मुदत ठेवी ठेवल्या होत्या.

कालांतराने पतसंस्था अडचणीत गेली. त्यामुळे अनेक ठेवीदारांच्या लाखों रुपयांच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. साळुंखे यांनी संस्थेत ठेवलेल्या ठेव पावत्यांची मुदत संपली तरी ही त्यांना परतावा मिळाला नाही. पुंजी परत मिळत नसल्याने ते त्रस्त झाले. संचालक मंडळ व व्यवस्थापनाकडे वारंवार विनंत्या केल्या. मात्र ठेवींचा परतावा मिळाला नाही. पैसे परत मिळण्यासाठी त्यांनी मग ग्राहक न्याय मंचाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेथे तक्रार दाखल केल्यानंतर सुनावणी होऊन साळुंखे यांना मुदत ठेवींची मुदत संपेपर्यंतच्या तारखेपर्यंत नमुद व्याजदरासह व मुदत संपलेनंतर दसादशे नऊ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा आदेश न्याय मंचाने दिला. तसेच, मानसिक त्रासापोटी दोन हजार, तक्रार अर्जाचे खर्चापोटी एक हजार रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले. जाबदाराने न्याय निर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासुन तीस दिवसांत आदेशाचे अनुपालन कऱण्यात यावे, असेही आदेशात म्हटले. मात्र, न्याय मंचाच्या आदेशानुसार जाबदारांनी तक्रारदारांना देय असलेली 12 लाख 46 हजार रुपये रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी अर्ज करुन सदरची वसुली एरिअर्स ऑफ लॅंड रेव्हेन्यू प्रमाणे वसुल होऊन मिळणेसाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 25 (3) प्रमाणे मागणी केली.

संबंधित जाबदारांवर पुढील कारवाई करण्यासाठी मंचाने जिल्हाधिकारी यांना आदेश दिले. त्यानुसार पतसंस्था व संचालिका डॉ.उर्मिला दिलीप येळगावकर (सातारा), यांच्यासह यशोदीप पतसंस्थेचे व्यवस्थापक जावेद गणीभाई मुल्ला, चेअरमन शिवाजीराव शंकरराव पाटील, व्हाईस चेअरमन चंद्रकांत लक्ष्मण पवार ( औंध, ता. खटाव), संचालक मकरंद तोरो, अजित अशोकराव सिंहासने, महेश गणेश गुरव (वडुज), प्रकाश बाबुराव कणसे, संजय धोंडीराम मोरे, चंद्रकांत आनंदराव घाडगे. राजाराम विलास कचरे, शांताबाई शिवाजी पाटोळे यांच्या मिळकती विकुन तक्रारदारांच्या रकमा वसुली करुन द्याव्यात असे आदेश दिले. मात्र, राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांनी त्याकडेही कानाडोळा केला. मात्र साळुंखेनी हार पत्करली नाही. त्यांनी न्यायासाठी जिद्दीने थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना गाठले. कैफियत मांडली.

मुंढे यांनी त्याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मांडुन दिरंगाईसाठी जिल्हाधिकारी व तहसिलदारांवर ताशेरे ओढले. त्याचा परिणाम म्हणुन अधिकाऱ्यांनी धीटाईने अखेर यशोदीप पतसंस्थेच्या वडुज येथील शाखेच्या इमारत लिलावाची प्रक्रिया सुरु केली. मंगळवारी लिलाव होणार होता. लिलाव होऊ नये यासाठी लिलावादिवशीच पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने साळुंखे यांना ठेवींचा साडेबारा लाख रुपये परतावा दिला. दरम्यान, साळुंखे यांना ठेवींचे पैसे परत मिळाल्याने अनेक ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. पैसे परत मिळण्याचा मार्ग सापडला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)