तंदुरुस्त पिढी घडवण्यासाठी मैदानी व बौद्धिक खेळ काळाची गरज : डॉ. प्रमोद रसाळ

आंबी (ता. मावळ) : डॉ. प्रमोद रसाळ, ऍड. सुशांत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळ खेळून स्पर्धेला सुरुवात केली.

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – बलदंड मल्लांच्या शरीरात लवचिकता व चपळाई निर्माण करण्यासाठी याच मातीतून मलखांब खेळाची सुरुवात झाली. त्याचबरोबर लवचिक व चपळ मल्लांमध्ये एकाग्रता, निर्णय क्षमता, सावधानता, युद्ध कौशल्य व बौद्धिकता वाढवण्याची बुद्धिबळ खेळाची निर्मिती झाली आहे. महाभारताच्या काळातही बुद्धिबळ खेळाचा उल्लेख आहे. आधुनिकीकरण तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचा ओढा संगणक व मोबाईल खेळावर वाढला आहे. यामुळे त्यांना शारीरिक व्याधी वाढून पिढी कमजोर होत आहे. भारताची तंदुरुस्त पिढी घडवण्यासाठी मैदानी व बौद्धिक खेळ काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी महाविद्यालय (पुणे) सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ व मल्लखांब खेळाच्या स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी शनिवारी (दि. 15) आंबी (ता. मावळ) येथील डॉ. डी. वाय. पाटील टेक्‍निकल कॅम्पसच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी ऍड. सुशांत पाटील होते.

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शरद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शामराव भगत, प्रा. सुधाकर निंबाळकर, प्रा. महेश कुंभार, प्रा. सचिन काशीद, धनाजी काकडे, शरद घोगले, जितेंद्र वाळिंबे, उमेश खिंगरे, सुधीर वनारसे, प्राध्यापक, खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. रसाळ पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जोपासून त्या क्षेत्रात करियर करावे. खेळातूनच विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विकास होतो. या महाविद्यालयात प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

बुद्धिबळ व मलखांब स्पर्धा शनिवारी (दि.15) व रविवार (दि.16) या दोन दिवसात सुरू होत्या. यात 42 मुलांच्या व 16 मुलींच्या संघांच्या खेळांडूनी बुद्धिबळ स्पर्धेत तर मलखांब स्पर्धेत 8 मुलांच्या संघांनी सहभाग घेतला होता. एका वेळी 180 खेळांडूना खेळण्याची व्यवस्था केली होती. या वेळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. महेश कुंभार, प्रा. सचिन काशीद, धनाजी काकडे, शरद घोगले, जितेंद्र वाळिंबे, उमेश खिंगरे, सुधीर वनारसे हे पाहत आहे. या स्पर्धेचे आयोजन पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (दि. 16) इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शरद पाटील, संस्थेचे विश्‍वस्त बी. डी. कोतकर, पी. व्ही. भागवत यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शामराव भगत यांनी केले. सूत्रसंचालन अनुश्री माने व हर्षल मावळे यांनी केले. प्रा. सुधाकर निंबाळकर यांनी आभार मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)