ढोल पथके तुपाशी, वादक मात्र उपाशी

पथकांना लाखोंच्या सुपाऱ्या, वादकांच्या नशीबी वडा पाव

पुणे – गणेशोत्सवा दरम्यान पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्यायचे म्हणुन अलिकडच्या काळात शहरातील गणेशोत्सवात सहभागी ढोल – ताशा पथकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ढोल – ताशा पथकांची गणेशोत्सवात लाखोंची उलाढाल होते. मात्र वादक युवक – युवतींच्या हाती काहीच पडत नाही. या अर्थकारणामुळेच शहरातील ढोल – ताशा पथकांची संख्या सुमारे पावणे दोनशेच्या घरात पोहचली आहे. ही ढोल पथके गणेशोत्सव मंडळाकडून प्रतीतास 35 ते 50 हजार रुपये घेत असतात. ही बाब लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात पथकांची उलाढाल काही कोटींच्या घरात जाते, मात्र पथकांना तारणाऱ्या आणि रात्रभर ढोल वाजवणाऱ्या तरुणांना कोणतेही मानधन दिले जात नाही.

ढोल ताशा पथकांमध्ये सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावून तरुणांना आवाहन केले जाते. सहभागी तरुणांकडून किमान महिनाभर दररोज दोन ते चार तास असा सराव करुन घेतला जातो. तरुण-तरुणी एक उत्साह तसेच वेगळे काही तरी करण्याच्या हेतूने ढोल पथकात सहभागी होतात. मात्र सहभागी तरुणांना ढोल पथकांकडून साधे पिण्याचे पाणीही दिले जात नाही. सरावासाठी आलेले तरुण घरुनच पाणी घेऊन येतात. एका पथकात साधारण 40 ते 80 वादक सहभागी असतात. शहरातील काही मोठी मंडळे मिरवणूकीत तीन ते चार पथकांना सहभागी करुन घेतात. ही मिरवणूक प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी चार ते सहा तास तर विसर्जनाच्या वेळी 12 तास चाललेली असते. पथकातील तरुण घामाघुम होऊन ढोल बडवतात. त्यांच्या नाष्टयाची सोयही ढोल पथकाच्या प्रमुखाने केलेली नसते. मंडळ जे काही वडापाव व तत्सम पदार्थ देईल त्यावरच त्यांना अवलंबून रहावे लागते. मिरवणूकीत शाररीक तसेच मानसीक कष्ट होतात. दुसऱ्या दिवशी पथकात सहभागी तरुणांना अनेकदा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. ढोलपथकाचे प्रमुख मात्र मालामाल झालेले असतात. यामुळे ढोल पथक स्थापन करुन पैसे कमावणे हा एकमेव उद्देश दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)