ढोल पथकांत मुली खरोखरच सुरक्षित?

आरोग्य आणि स्वच्छतागृहांचा मुद्दाही गंभीर
श्रध्दा कोळेकर

पुणे – ढोल पथकांमध्ये मुलांच्या बरोबरीने मुलीही उतरल्या, त्यांनी स्वत:ला सिध्दही केले आहे. मात्र दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या या ढोल पथकांमध्ये खरोखरच मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा तितका गांभिर्याने हाताळला जातो आहे का? हाच खरा प्रश्‍न आहे. त्याबरोबरच लहान वयात पथकात येणाऱ्या मुलींचे आरोग्य आणि एकूणच मिरवणूकीदरम्यान असणारी महिला स्वच्छतागृहाची वानवा हाही दिवसेंदिवस गंभीर मुद्दा होत चालला आहे.

सुरुवातीलच्या काळात साधारण बारा पंधरा वर्षांपूर्वी ढोल ताशा पथकांची संख्या मुळातच कमी होती. काही निवडक शाळांच्या माध्यमातून मुलींची ढोलपथके चालवली जात होती. त्या मुलींची सुरक्षितता ही त्या शाळांची जबाबदारी होती. त्यानंतर मुलींचे ढोल पथक अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अनेक ढोल पथके आली. ढोल पथकांचे बदलते स्वरुप लक्षात घेता जबाबदार पथक चालकांकडून ती वेळेत बंदही करण्यात आली. मात्र सध्या ढोल पथकांचे जे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी उतरत आहेत ते खरोखरच मुलींच्या सुरक्षिततेबाबत कितपत जागरुक आहे असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.
एका माजी ढोल पथक प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, मिरवणूकीदरम्यान ढोल पथकात असणाऱ्या मुलींची अनेकदा छेड काढली जाते. मुलींची छेड हा बऱ्यापैकी सर्वसामान्य विषय असल्यामुळेच त्याची हवी तितकी गंभीर दखल घेतली जात नाही. रात्रीच्या मुली सराव करतात त्या जागाही अनेकदा तितक्‍या सुरक्षित नसतात. मिरवणूकीदरम्यान असो किंवा सरावादरम्यान असो.. मुलींच्या स्वच्छतागृहाचा मुद्दा कायमच दुर्लक्षित केल्याचे दिसते. पथक प्रमुख पैसे कमविण्याच्या दृष्टीकोनातून वादन करतात परंतु त्या तुलनेत किमान सुरक्षितता किंवा किमान सुविधाही दिल्या जात नाहीत.

पथकांमध्ये अनेक लहान मुलींच्या कमरेवर ढोल बांधले जातात, वाजवताना ते सरकत ओटी पोटावर येतात. अनेक मुलींना याचा कळत नकळत त्रास होते हे त्यांनाही कळत नसतं. अनेक पथक प्रमुख याची कोणतीही माहिती न घेता हे ढोल चुकीच्या पध्दतीने बांधतात. कोवळ्या वयातील मुलींवर याचा मोठा परिणाम पहायला मिळतो. आजमितिला काही अपवाद सोडले तर अनेक पथकांमध्ये लहान मुले मुली आहेत. त्या लहानग्यांना तेवढा ध्वनी खरोखरच त्यांना नाजूक कानांवर पडून त्यावर परिणाम करु शकतो हे माहित नसते. परंतु पालकही हौसेपोटी त्यांना जाऊ देतात.

दिवसेंदिवस मुलामुलींच्या पथकांची संख्या वाढते आहे, त्यात भांडण तंटे हा विषय वाढतो आहे, त्यातून शिस्त हरवते आहे. महाविद्यालयांमध्ये जेव्हा अश्‍या प्रकारची भांडणे, तंटे होतात तेव्हा काही प्रमाणात ती महाविद्यालयांची जबाबदारी रहाते. मात्र इथे वाली कोण? असाच प्रश्‍न निर्माण होतो आहे. त्यामुळे या उत्सवाच्या स्वरुपाला अतिउत्साहाचे स्वरुप न आणता शिस्तबध्द करण्यासाठी आता पुढील काळात प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)