ढोल ताशांचे घुमू लागले निनाद …

गणेशोत्सवाची चाहुल : सरावाला झाली सुरवात

नगर- जशी गणेश मुर्तीच्या कारखान्यांमधुन मुर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे तसेच आता सायंकाळच्या वेळी मैदाना मैदानातून ढोल ताशांचे निनाद कानी पडु लागले आहेत. तालबद्ध वाजणाऱ्या वाद्यांचे आवाज कानी पडताच गणरायाच्या आगमनाची चाहुल लागते. गणेशोत्सवात कर्णकर्कश्‍य आवाजाला योजनाबद्ध रितीने फाटा देण्यात यश येवू लागले ते या ढोलपथकांमुळे, शिवाय मंगलप्रसंगी,उत्सवात मंगलवाद्ये वाजविण्याची परंपरा पुन्हा एकदा रुजू लागली आहे.शहरातील तरुणाईचाही दांडगा प्रतिसाद मिळत असल्याने.ढोल पथकांच्या संयोजकांचाही उत्साह द्विगुणित होतांना दिसतोय.

आज मितीला नगर शहरात ढोलपथकांची संख्या 8 ते 10 च्या घरात आहे. शिवाय काही शाळांची ढोल ,लेझिम ,झांज पथकेही गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होवू लागली आहेत . चार वर्षापुर्वी शहरात दोनच ढोलपथके होती. रुद्रनाद आणि तालयोगी या ढोल पथकांनी नगरकरांना भुरळ पाडल्या नंतर अन्य पथकांमध्येही चैतन्य निर्माण होवून ढोल पथकांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. सध्या शहरात तालयोगी,रुद्रनाद , रुद्रवंश , ऱ्हिदम, हिंदवीशौर्य, पद्मनादम, आणि भिंगार मधील निर्विघ्नम आदी ढोलपथकांच्या तालिमी सुरू आहेत. रविवारी दुपारी आणि अन्य दिवशी सायंकाळी या ढोलपथकांचे सराव सुरू असल्याने ढोलताशांचे निनाद कानी पडताच परिसरात चैतन्यमयी वातावरण निर्माण होते.

यंदा नव्यानेच सुरु झालेल्या पद्मनादम या पथकात 80 मुले असून त्यात ढोल वाजविणारे 40 ताशे वाजविणारे 10 ,एक टोल आणि ध्वजधारी काही असे हे पथक असुन युवक युवतींनी 5 ते 6 तालांचे डाव बसविले असून नाशिक ढोल , शिवगर्जना , वक्रतुंड ,लावणी आदी डावांवर सराव सुरू आहे.हिंदवीशौर्य या ढोलपथकात 50 सदस्य असून 30 युवक आणि 20 युवतींचा हा चमु सध्या सरावात व्यग्र आहे. या पथकात 40 ढोल ,10 तासे ध्वज आणि टोल असा ताफा आहे . तालयोगी या ढोलपथकात 100 मुले आणि 30 मुलींचा ताफा असून 60 ढोल , 25 ताशे, 5 झेंडे, 1 टोल , 15 झांज असा ताफा असून नगरी ताल ,पुणेरी ताल , गावठी ताल, करमोळी ताल , चपाती ,भांगडा, गरबा आदी ताल वाजविण्यात या पथकाचा हातखंडा आहे. रुद्रवंश या ढोल पथकात 150 जणांच्या ताफ्यात 100 ते 110 मुले व 40 मुलींचा समावेष असून 6 प्रकारचे हात, 21 प्रकारचे ताल वाजविण्यात हा ताफा तरबेज असून गेल्या तीन वर्षापासुन गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरा समोर गणरायाची सेवा म्हणुन ढोल वादन करून सेवा देतात. या ढोलपथकाचे सिन्क्रोनायझेशन (वाद्यातील समन्वय ) उत्तम आहे. तर नगर मध्ये ढोलपथकांची सुरवात करणाऱ्या पथकांपैकि एक असलेल्या रुद्रनाद ढोलपथकाच्या ताफ्यात यंदा 150 ते 200 जणांचा ताफा असून 100 ढोल ,25 ताशे ,11 ध्वज ,1 टोल असा लवाजमा आहे. लगान , रेल्वे आणि पारंपारिक तालात ढोल वादन हे या पथकाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे नुकत्याच हैद्राबाद येथे झालेल्या गुरूपौर्णिमेच्या साई पालखी सोहळ्यात या पथकाला तेथे जावून आपल्या वादनाचे आणि कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. हि नगरच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

नगर मधील ढोलपथकांना शहरातील मोठमोठी मंडलेच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही वादना साठीची निमंत्रणे येतात. अर्थात ढोलपथकांना मिळणारे मानधन हे यथा तथाच असते तरी सुद्धा शिस्तबद्ध पथकांच्या माध्यमातून परंपरा जोपासना हाच उद्देश ठेवून हि पथके सुरू ठेवली आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)