ढोल-ताशांचा बाजार अजून थंडच

प्रभात वृत्तसेवा

पुणे – गणेशोत्सवाच्या काळात सर्वाधिक मागणी ढोल-ताशांना असते. त्यामुळे उत्सवाच्या आधी पंधरा दिवस या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायला लागते. साधारणतः दरवर्षी एकट्या पुणे शहरात पन्नास लाखाहून अधिक ढोल-ताशांच्या खरेदी-विक्रीची उलाढाल होत असते. यंदा मात्र अद्याप उत्सवाचा रंग चढलेला दिसत नाही. या बाजारपेठत फेरफटका मारला असता सध्या तरी दुकानदारांकडे किरकोळ कामांशिवाय अद्याप मोठी कामे आली नसल्याचे दिसून येते.

काही वर्षापुर्वी गणेशोत्सवाच्या काळात मिरवणूकीसाठी स्पीकरच्या उंच भिंती उभारल्या जायच्या, त्यामुळे पारंपरिक वाद्ये असणाऱ्या ढोल-ताशांची मागणी कमी झाली होती. त्याचबरोबर ढोल-ताशांची पथकेसुद्धा मर्यादित असल्याने प्रत्येक मंडळाला ती उपलब्ध होऊ शकत नव्हती. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्तेही स्पीकरच्या भिंतींना पसंती देत होते पण काही वर्षापुर्वी न्यायालयाच्या निर्णयामुळे स्पीकरच्या भिंती कमी झाल्या आणि ढोल-ताशाला मागणी वाढू लागली. ढोल-ताशांची वाढती मागणी लक्षात घेता, वाजविणारी पथके वाढली. परिणामी बाजारपेठत पुन्हा मागणी वाढू लागली.

पुणे शहरातच आज शेकडोहून अधिक अशाप्रकारची पथके आहेत. या सगळ्यांची तयारी गणेशोत्सवाच्या आधी तब्बल महिनाभर सुरु होते. त्याचकाळात मग बाजारपेठेतही रेलचेल सुरु होते. नवीन ढोल खरेदी किंवा जुन्यांची दुरुस्ती करणे, ताशा विकत घेणे, यासाठी या पथकातील कार्यकर्त्यांची गर्दी सुरु होते. पुण्यात काही वर्षापुर्वी ठराविक ढोल-ताशा विक्रीची मोजकीच दुकाने होती पण आता मात्र त्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये साधारणतः तीन ते चार कारागीर असतात, त्याचे काम केवळ ढोल-ताशांची दुरुस्ती करणे हे असते.

यासंदर्भात पुण्यातील नाईक म्युझिकल चे विजय नाईक म्हणाले. सध्या बाजारात दोन हजारांपासून ते साडे तीन हजारपर्यतचे ढोल उपलब्ध आहेत. निरनिराळ्या आकारात ढोल असल्याने त्यांच्या किंमतीही तशाच असतात. ढोल हे पारंपरिक वाद्य असल्याने त्याला मागणी नेहमीच असते पण गणेशोत्सवाच्या काळात त्यात आणखी भर पडते. स्पीकरच्या भिंती उभारण्याचे प्रमाण कमी झाल्यावर ढोल खरेदीची मागणी वाढू लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन ढोल खरेदी करणाऱ्यापेक्षा दुरुस्तीचे काम जास्त आहे. अनेकांना ढोलचे कातडे बदलून हवे असते. ते बदलण्यासाठीच जास्त गर्दी होत असते. चांगल्या प्रतीचे कातडे लावल्यावर त्यातून येणारा आवाज सुद्धा तितकाच दणकेबाज असतो. त्यामुळे कार्यकर्ते कातडे बदलण्यासाठी येत असतात. ताशांच्या बाबतीतही तसाच प्रकार आहे. बाजारात पाचशे रुपयांपासून साडेतीन हजारापर्यत ते ताशे उपलब्ध आहेत. पाचशे रुपयांचा ताशा हा साधारणत; स्टिलचा असतो त्याचबरोबर तांबा पितळेचे ढोल सुद्धा बाजारात असतात. त्यांची किंमत जास्त असते. हे ताशे साधारणत; साडेतीन हजारांच्या पुढे आहेत.

गणेशोत्सवात होणारी उलाढाल लक्षात घेता दरवर्षी साधारणत: पन्नास लाखाहून अधिक उलाढाल या ढोल-ताशांच्या दुरुस्ती आणि विक्रीतून होत असते.मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असतात. गणेशोत्सवाच्या पंधरा दिवस आधी आमच्याकडे गर्दी होण्यास सुरुवात होते पण यंदा मात्र चित्र वेगळे दिसत आहे. अद्याप बाजारपेठत म्हणावी अशी रेलचेल सुरु झालेली नाही. गणेशोत्सव आता दहा ते बारा दिवसांवर आला आहे. त्यामुळे उलाढाल सुरु होणे आवश्‍यक होते. चलन तुटवडा असल्यामुळे हे झाले असावे अशी शक्‍यता आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)