ढोलवादनाच्या रेकॉर्डला “गिनीज’चा हिरवा कंदील

आता रविवारी ढोलवादनाच्या नियोजनाची शक्‍यता

प्रभात वृत्तसेवा

पुणे – सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्‍वविक्रमी ढोलवादन कार्यक्रमासाठी अखेर “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ संस्थेकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आता गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी म्हणजे तीन सप्टेंबरला हा कार्यक्रम आयोजित करण्याची शक्‍यता आहे. याविषयी महापालिकेतील उपायुक्‍त सुरेश जगताप यांनी माहिती दिली.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे वर्ष हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने पुणे महापालिका आणि ढोलताशा महासंघाच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी एकाचवेळी तीन हजार 600 ढोलवादनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी या कार्यक्रमासाठी महापालिकेने प्रथम स. प. महाविद्यालयाचे मैदान निश्‍चित केले होते. मात्र, पोलीस आयुक्‍तांनी शांतता झोनचे कारण देत त्याला परवानगी नाकारली होती. अखेर बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे ढोलवादनाचा कार्यक्रम करण्याचे निश्‍चित झाले. त्यासंदर्भात मैदानाचा परिसर आणि ढोलवादकांची रचना यासंदर्भातील नकाशेही महापालिकेतर्फे “गिनीज संस्थे’कडे सादर करण्यात आले होते. मात्र, या नकाशांना शुक्रवारी रात्रीपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. त्यातच शनिवारी आणि रविवारी गिनिजच्या कार्यालयास सुट्टी असल्याने हा कार्यक्रमच तात्पुरता पुढे ढकलण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली होती. अखेर आता गिनीज संस्थेकडून आवश्‍यक तांत्रिक परवानग्या मिळाल्या असून, आता विश्‍वविक्रमी ढोलवादनाचा कार्यक्रम तीन सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन केले जात असल्याचे जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)