ढोलपथकाचा ‘फ्युजन’ सातासमुद्रापार

ढोलविक्रेत्यांचे अर्थकारण बदलले : अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅन्डमध्ये निर्यात

पुणे – ग्रामीण भागात वार्षिक जत्रेत किंवा कुस्ती स्पर्धा सुरू असेल, तर आनंदाने ढोल बडवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार होता. मात्र, आता या ढोलांनीही प्रतिष्ठा मिळवली असून, थेट शहरांमध्ये दीडशे ते दोनशे ढोलांची पथकेच स्थापन झाली आहेत. त्यातून एक नव्हे तर अनेक ढोलपथके गणेशोत्सव काळात आपले वादन गणेश मंडळांपुढे सादर करत असतात. यामुळे ढोलपथकांबरोबरच ढोलविक्रेत्यांचे अर्थकारणही बदलले आहे. त्यांना चांगले दिवस आले आहेत. दिवसेंदिवस पथके वाढतच असून, आमच्याकडून एकेक पथक 30 ते 50 ढोल विकत घेतात, अशी माहिती ढोल विक्रेते विजय नाईक यांनी दै. प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

गेल्या 15 वर्षांपासून ढोलांची मागणी दरवर्षी वाढतच आहे. अगदी दोन-तीन हजारांपासून ढोलाच्या किंमती आहेत. त्यातूनही चमड्याचे आणि फायबरचे पान लावलेले ढोल असतात. फायबरच्या पानांपेक्षा चमड्यांच्या पानांना जास्त मागणी असते, असे नाईक म्हणाले. हे चमडे लातूर, नळदुर्ग, जालना, परभणी याठिकाणाहून आणले जाते. जालना, परभणी या दोन ठिकाणची चमड्याची क्‍वॉलिटीही जास्त चांगली असते. चमडे किती चिवट यावर त्याची क्‍वालिटी आणि कॉस्ट ठरते.

पूर्वी ढोल हे लाकडाचे असत. लाकडावर चमड्याचे पान लावले जात होते. मात्र, आता लोखंडी पत्रा लावून त्यावर “गॅल्वनाईज’चे कोटींग केले जाते. त्यामुळे तो ढोल ऍल्युमिनियमसारखा दिसतो. या बदलांबरोबरच ढोलांच्या वजनातही आता बराच बदल झाला आहे. पूर्वी 15 किलो वजनाचे 18 इंची ढोल असायचे. मात्र, आता ते 18-20 किलो आणि 27-28 इंचांपर्यंत गेले आहेत. याचे कारण म्हणजे जेवढा मोठा ढोल तेवढा त्याचा आवाज जास्त असा समज आहे. त्यामुळे मोठ्या ढोलांना पथकांकडून पसंती मिळत आहे. केवळ मोठ्यांचेच नव्हे तर लहान मुलांसाठीही त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि वजनाप्रमाणे ढोल मिळू लागले आहेत.

ढोल बनवणे आणि विक्री करणे यामध्ये नाईक यांची दुसरी पिढी आहे. यशवंत नाईक यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि मुलगा विजय यांनीही या व्यवसायात बस्तान बसवले आहे. मूळ व्यवसाय तबला बनवण्याचा आहे. मात्र, ढोलांची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी तेही उपलब्ध करून देण्याला सुरूवात केली आहे.

केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅन्ड या ठिकाणीही ढोल एक्‍स्पोर्ट केले जातात. त्यातील ऑस्ट्रेलिया वगळता अन्य देशांमध्ये चमड्याची पाने पाठवण्याला काही समस्या येत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियात फर्मिनेशन करून ते पाठवले जातात, असे नाईक यांनी सांगितले. पुण्यातीलच अनेक युवक या देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांना ढोलांची संस्कृती माहित आहे. तेथील महाराष्ट्र मंडळांमधून या ढोलांची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून लेझीमलाही मागणी असून, शाळांमधून ती मागणी होत आहे. हलगींनाही यापुढे मागणी जास्त येण्याची शक्‍यता असल्याचे नाईक यांनी आवर्जून नमूद केले. एकंदरीतच आता गणेशोत्सवात आधुनिकतेबरोबर पारंपरिक वादनाचे प्रकार येत असल्याने उत्सवामध्ये “फ्युजन’ पहायला मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)