ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत

चिंबळी- परतीच्या पावसाने चिंतेत टाकलेल्या बळीराजाला आता ढगांच्या घोळक्‍याने घाबरवण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर महिना संपण्यावर आला असून या महिन्यात केवळ बोटावर मोजण्यापर्यंतच्या दिवशी थंडी होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडी गायब झाली असून आकाशात ढगांनी दाटी केल्याने बळीराजांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत. दरम्यान, परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी जेमतेम झाली, त्यात ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणामुळे आता पिकांवर रोगराईने ग्रासण्याची शक्‍यता निर्माण झाल्यने शेतकरी भयभीत झाला आहे.
खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, झेंडू, अष्टर आदी पिके घेतली. मात्र, परतीच्या पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहिरींच्या पाण्यावर पिके जगवली आहेत. मात्र, सध्या कडाक्‍याची थंडी पडण्या ऐवजी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे.
चिंबळी, कुरुळी, मरकळ, गोलेगाव, निघोजे, मोई, कोयाळी, केळगाव आदी परिसरात रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, कांदे या पिकांवर ढगाळ वातावरणाचा विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. पाऊस पडल्यास पिकांना फायदा होईल. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळीचा प्रादूर्भाव वाढवणार आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामाच्या उत्पादकतेवरही परिणाम होणार आहे.
पिकांना प्रतिकूल वातावरणाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी जेमतेम झाली. ऑक्‍टोबर महिन्यात पुरेशी ओल नसताना पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र, पाऊस नसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ज्वारी हे महत्त्वाचे पीक मानले जाते. धान्य आणि चारा असा दुहेरी उपयोग असल्यामुळे ज्वारीच्या पिकाला पाण्याची किमान एक पाळी देण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे.

  • हरभाऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव
    सध्या हरभरा पिकाची वाढ पूर्ण होत आहे. घाटेअळीचा हरभरा पिकात प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. प्रतिकूल वातावरण आणखी तीन दिवस राहिल्यास पिकांवर निश्‍चित दुष्परिणाम होण्याची भीती आहे. दरम्यान, पिकांची उत्पादकता टिकवण्यासाठी व अळीचा बंदोबस्त करण्यासाठी परिणामकारक औषधांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
  • ज्वारीवर “मावा’ची भीती
    ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, हरभरा, कांदे व फुल शेती पिकावर परिणाम होऊ लागला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी बांधवाना पिकांना जगवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागले. आता ढगाळ वातावरणामुळे येत असल्याने या पिकांवर “मावा’ची भीती सतावू लागली आहे. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. मावा कीड पाने खरवडते. त्यातून साखरयुक्‍त द्रव बाहेर येतो. या चिकट द्रवावर बुरशी वाढते. त्यामुळे धान्य आणि कडब्याची प्रत खालावते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)