ड्रेस सेन्स महत्त्वाचाच

आपण सामान्य माणसं. आपल्याला स्टाईल, फॅशन, ट्रेंड याबद्दल फारशी माहिती नसते. आपण जे पाहतो, जे वाचतो किंवा आपले स्टाईल आयकॉन जी स्टाईल करतात त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण करतो. जास्तीत जास्त स्टाईलिश दिसण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी हा प्रयत्न फसतोच. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, ज्यांचा फॅशन सेन्स चांगला असतो. ज्यांना स्टाईलची बरीच माहिती असते अशा माणसांत जेव्हा आपली उठबस होते, तेव्हा मात्र आपल्या अल्प फॅशन सेन्स ही चेष्टा होते. तू काय घातलंस, तू असं करायला पाहिजे होतं, तुझ्यावर हे चांगलं दिसत नाही असे अनेक सल्ले कानावर पडतात. अशा वेळी फॅशनेबल आणि उत्तम दिसण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही यासाठी टिप्स.

कपडे महागडे असो किंवा स्वस्तातले; पण कुठेही जाताना त्याला कडक इस्त्री नक्की करा. इस्त्री करणं खूप कंटाळवाणं काम असतं, त्यामुळे कडक इस्त्री करून कपडे घालण्यापर्यंतचा वेळ आणि तेवढी सहनशक्ती फार कमी लोकांमध्ये असते. पण सुरकुत्या न पडलेले कपडे घालून आजूबाजूला वावरताना तुमची एक वेगळी छाप लोकांवर पडते. तुम्हाला टापटिप राहणं आवडतं हे त्यातून दिसतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहमी योग्य मापाचे कपडे निवडा. काही जण आपल्याला हे कपडे आवडले आहेत म्हणून माप न बघतातच कपडय़ांची खरेदी करतात. काही आकारापेक्षा मोठे कपडे निवडतात तर काही कपडे घट्ट होत असले तरी स्वत:ला त्यात कोंबण्याचा प्रयत्न करतात. या दोन्ही गोष्टी करणं कटाक्षानं टाळा. कपडे योग्य मापाचे घाला. कुठेही ओंगळवाणं बनून जाऊ नका. कारण कितीही म्हटलं तरी लोक तुम्हाला तुमच्या बाह्य रूपावरून जास्त ओळखत असतात.

कपडय़ांबरोबरच स्वत:कडे चांगल्या दर्जाच्या चपला असू द्या. लोक ब-याचदा चपलांच्या बाबतीत बेफिकीर असतात; पण मानसशास्त्राप्रमाणे ब-याच लोकांचं पहिलं लक्ष हे तुमच्या चपलांकडे जातं. त्यामुळे अगदीच अडचण सोडली तर चांगल्या चपला वापरा. प्रत्येक ड्रेसेसवर वेगवेगळ्या चपला वापरणं परवडण्यासारखं नसतं; पण आपण जी चप्पल वापरतो तिची योग्य काळजी घ्या. नेहमीच त्या साफ ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा रंगसंगतीच्या चपला निवडा ज्यावर धूळ पटकन दिसणार नाही. धुळीनं माखलेल्या, माती किंवा चिखल लागलेल्या चपला घेऊन एखाद्या ठिकाणी जाऊ नका. इम्प्रेशन फार वाईट पडतं.

खूप मेटल नसलेली एक साधी पण फॅशनेबल बॅग सोबत ठेवा. काही खास प्रसंग सोडले तर रोजच्या जीवनात बटबटीतपणा टाळा. मेकअप करणं म्हणजे तोंडावर खोटा मुलामा चढवण्यासारखं आहे असं अनेक जण मानतात. फार नाही, पण अगदी थोडाफार मेकअप तुम्ही करून जायला काहीच हरकत नाही. एखादं काजळ, आयलायनर किंवा ओठांवर न्यूड शेडची लिपस्टिक असं तुम्ही ट्राय करू शकता. यामुळे तुम्ही जास्त मेकअप केला आहे असं अजिबात वाटत नाही.

बरेच जण पॅंट, जीन्स, स्कर्ट वापरतात. या पॅंट, स्कर्टच्या सगळ्यात वरच्या बाजूला लूप असतात. साध्या भाषेत सांगायचं तर बेल्ट व्यवस्थित राहावा यासाठी जोडण्या असतात. याचाच अर्थ बेल्टसाठी ते दिलेलं असतं. पण काही जण बेल्ट लावतच नाही. पण दिसताना ते मात्र अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. तेव्हा अशा वेळी बेल्ट जरूर वापरा आणि चांगल्या दर्जाचा आणि चांगला लूक असणा-या बेल्टची निवड करा. पॅंट किंवा स्कर्टचा लूक चांगला दिसतो.

सगळं करत असताना हातांच्या नखांना दुर्लक्षित करू नका. एकतर नेलपेंट पूर्ण लावा किंवा लावू नका. अर्धवट निघालेल्या नेलपेंट असलेली बोटं पाहून तुम्ही आळशी आहात किंवा तुम्ही व्यवस्थित राहण्याला पूर्ण महत्त्व देत नाही हे दिसून येतं.

फार अॅक्‍सेसरीज नाहीत; पण हातात घडय़ाळ, कानात इअररिंग आणि गळ्यात साधा नेकपिस असू द्या. मुलींनी कपडय़ांवर साजेसा असा स्कार्फ नक्की सोबत बाळगा.

काही जण कपडे विकत घेण्यापेक्षा शिवून घेण्याला प्राधान्य देतात. पण अशा वेळी कापडाची निवड करताना योग्य कापडाची निवड करा. सिंथेटिक कापडापेक्षा रेशीम, खादी, सुती अशा कापडाला जास्त प्राधान्य द्या.

महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे तुम्ही काहीही घाला; पण आत्मविश्वासानं घाला. एकदा घालून बाहेर पडल्यावर हे चांगलं दिसत आहे की नाही, लोक काय म्हणतील, काही विचित्र वाटत नाही ना या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका. आत्मविश्वासानं कपडे कॅरी करा.

– प्राजक्ता सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)