ड्रिलने घेतला विद्यार्थ्यीनीचा बळी

पहिल्या मजल्याच्या गॅलरीवर डोके आपटून दुर्दैवी मृत्यू
चेन्नई – आपातकालीन परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचे प्रात्यक्षिक देत असताना 19 वर्षीय विद्यार्थ्यीनीचा कॉलेजच्या इमारतीतून पडून मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थ्यींनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्यास तयार नव्हती. मात्र ट्रेनरने तिला खाली ढकलल्याने पहिल्या मजल्याच्या गॅलरीवर डोके आपटून तिचा मृत्यू झाला.

एन. लोकेश्वरी असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना कोईंबतूर येथील कोवाई कलाईमगल कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्समध्ये घडली आहे. कॉलेजमध्ये आपातकालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रात्यक्षिक सुरू होते. राष्ट्रीय आपातकालीन व्यवस्थापनाकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात येत होते. यावेळी अनेक विद्यार्थी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर जमले होते. या विद्यार्थ्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचे प्रशिक्षण ट्रेनर देत होते. तसेच उडी मारणाऱ्या मुलांना झेलायला जाळी पकडून काही विद्यार्थी खाली उभे होते.

पाच विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या हे प्रात्यक्षिक पार पाडले. मात्र 19 वर्षीय बीबीएची विद्यार्थ्यीनी एन. लोगेश्वरी या प्रात्यक्षिकासाठी तयार नव्हती. इमारतीवरून उडी मारण्याची तिला भीती वाटत होती. पण ट्रेनरने तिला कोणताही विचार न करता दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यावेळी लोगेश्वरीच्या डोक्‍याला भिंतीचा मार बसल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीने कोईंबतूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी तिला मृत घोषीत केले.

दरम्यान, प्रशिक्षक अरुमुगन यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत लोकेश्वरीच्या मृत्यूप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)