‘ड्युटी सुरू करताना मी प्रत्येक नियम पाळणार’

वारंवार नियम तोडणाऱ्या लोको पायलट्‌ससाठी रेल्वेची “गांधीगिरी’

पुणे – रेल्वे मार्गावर लाल दिवा (सिग्नल) दर्शवित असतानाही रेल्वे पुढे नेण्याचा प्रयत्न काही लोको पालयट करतात. त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक लोको पायलट “ड्युटी सुरू करताना मी प्रत्येक नियम पाळणार’ असे लेखी वचन देत आहे. याचा चांगला परिणाम झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातून कोल्हापूर, वसई रोड, इगतपुरी, मनमाड सोलापूरसह बारामतीला जाण्यासाठी मेल एक्‍स्प्रेस तसेच पॅसेजर रेल्वे आहे. या रेल्वेंवर लोको पायलटची रोज नियुक्ती केली जाते. हे सर्व पायलट पुणे रेल्वे स्थानकातून आपली ड्युटी सुरू करत असतात. अनेक वेळा लाल सिग्नल असला, तरी पुढे जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न पायलट करतात. याबाबत त्यांना सूचना देण्यात येतात. पण, अशा प्रकारे थोड्या काही अंतरावर जर रेल्वे गाडी थांबवली आणि दुर्घटना घडली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्‍यता असते.त्यामुळेच हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामध्ये प्रत्येक पायलट हा सकाळी ड्युटीवर आला, की कार्यालयातील फलकावर “मी नियम पाळणार’ असा मजकूर लिहून त्याखाली स्वाक्षरी करत आहे. त्याचबरोबर “मला जबाबदारीची जाणीव आहे’ असे दर्शविण्यासाठी तेथे एक बेल ठेवण्यात आली आहे. ती वाजवून प्रत्येक पायलट ड्युटीवर जात आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. शिवाय या पायलटसाठी आवश्‍यक प्रत्येक सुविधा या स्थानकावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या पायलट्‌ससाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, ध्यान मंदिर, व्यायामासाठी जीमसुद्धा देण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रयोग हा पुण्यात पहिल्यादा राबविण्यात येत आहे. मंडल यांत्रिकी इंजिनीयर जो. एल. मॅकेंजी यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे लोको पायलट्‌समध्ये एक प्रकारची जबाबदारी वाढल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाचे भविष्यात आणखी सकारात्मक परिणाम होतील. या पायलट्‌ससाठी आणखी सुविधा देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
– मिलिंद देऊस्कर, रेल्वे महाप्रबंधक, पुणे विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)