ड्युटीनंतरचाही मृत्यू नुकसानभरपाईस पात्र

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीत 4 दिवसांपूर्वी म्हणजेच 22 जानेवारी 2019 ला एका महत्त्वपूर्ण अपिलाचा निकाल देताना कामाची वेळ व जबाबदारी संपल्यानंतरच्या कालावधीत जरी अपघाती मृत्यू आला तरी संबंधित कामगार/नोकरदार नुकसानभरपाईस पात्र असेल असे स्पष्ट केले आहे.

लिलाबाई व इतर विरुद्ध सीमा चौहान व इतर या खटल्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या अपिलामधे एका बसचालकाचा मृत्यू झाला होता. सदर बसचालक इंदौर ते बुऱ्हानपूर या रस्त्यावर बसचालकाचे काम करीत होता. सकाळी 6-30 ते 11-00 इंदौर ते बुऱ्हानपूर व दुपारी 3-00 ते सायंकाळी 7-30 वाजता परत बुऱ्हानपूर अशी या बसचालकाची ड्युटी होती. सदर बसचालकाने 18/7/2010 रोजी आपला दिवसभराचा प्रवास करून संध्याकाळी 7-30 ला ड्युटी संपवली.

ऱात्री 8-30 वाजता सदर बसचालक एसटीच्या छतावर जेवण करून खाली उतरत असताना तो छतावरून पडून मृत पावला. एसटी विभागाच्या वतीने त्याची ड्युटी संपली होती, त्यामुळे त्याचा मृत्यू हा नोकरीच्या काळातील कक्षेत येत नसून कामगार भरपाई कायदा 1923 व त्यातील 2009 च्या सुधारणा नुसार अपघात न्यायाधीकरणाने नुकसानभरपाई फेटाळली. त्यावर नाराज होऊन त्याच्या वारसांनी सर्वोच्च न्यायालयात हे अपील दाखल केले.

प्रतिवादीच्या म्हणण्यानुसार सदर बसचालकाला 24 तासांची ड्युटी नव्हती. त्याची ड्युटी 7.30 ला संपल्याने त्यानंतर त्याचा मृत्यू रात्री 8.30 नंतर झाला, त्यामुळे नोकरीच्या वेळेबाहेर तो असल्याचे सांगितले गेले. तर अपीलकर्त्याच्या वतीने सदर ड्युटी जरी संपली होती तरी ड्युटीचे स्वरूप पाहता गाडी पार्क करून घरी जाण्याचे त्या बसचालकाला स्वातंत्र्य असल्याचे कोठेही स्पष्ट नव्हते तसेच सकाळी पुन्हा 6.30 ला कामावर यायचे हे त्या बसचालकाची कार्यक्षमता कमी करणारे होते. त्यामुळे बसचालक आठ आठ दिवस घरी न जाता आपली ड्युटी प्रामाणिकपणे करून प्रवाशांच्या सेवेसाठी सकाळी हजर राहात असत. रोज सकाळी घरी जाऊन सहा वाजता नोकरीवर हजर राहणे बसचालकाची कार्यक्षमता कमी करण्यासारखे होते म्हणून बसचालक तेथेच 8/8 दिवस राहात होता.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जनरल मॅनेजर बेस्ट, अंडटेकिंग बॉंम्बे विरुद्ध मिस्ट्रेस ग्ने (1964)3 एस सी आर 930 या खटल्यात स्पष्ट केले होते की व्यक्तीच्या नोकरीचे स्वरूप म्हणजे फक्त त्याला दिलेली जबाबदारी पार पडणे नसून त्यामधे अनेक बाबींचा समावेश असतो. कामाला जाण्याची वेळ, जेवणाची वेळ, परतीची वेळ, अशा बाबीचा सुद्धा त्यात समावेश असतो. जरी तो नोकरीच्या ठिकाणावरून गेला अथवा नोकरी ठिकाणी पोहोचणार असेल तरी त्या वेळेसह व सर्व बाबींचा (नोशनल एक्‍स्टेंशन) अनुमानीत वेळ विचारात घेणे गरजेची असते. त्यामुळे अशा खटल्याचा विचार करताना प्रत्येक बाबींचा काळजीपूर्वक विचार केला जाणे गरजेचे आहे. या खटल्यात सदर बसचालक त्या ठिकाणी थांबला तर तो सकाळी लवकर प्रवासासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्याच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होऊ शकतो त्याही गोष्टीचा विचार केला पाहीजे. असे मत खंडपीठाने व्यक्त केले. या सर्व बाबींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने मृताच्या वारसाला नुकसानभरपाई न देण्याचा न्यायाधीकरणाचा निर्णय रद्द केला व सदर बसचालकाचा मृत्यू नोकरीच्या सेवाकालावधीतच झाला असे ग्राह्य धरुन कामगार न्यायालय, आयुक्त खांडवा यानी मासीक 4275 रु . ईतका ग्राह्य धरलेला पगार मान्य करीत त्या पगारानुसार मृत बसचालकाच्या वारसाना नुकसानभरपाई, दंडाच्या रकमेसह देण्याचा आदेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)