डोळे बोलले अन्‌ पाच लाखांच्या लुटीचा बनाव उघडकीस

कर्जबाजारी व्यापाऱ्यानेच रचला पाच लाखांच्या लुटीचा बनाव

पुणे – कर्ज झाल्याने व्यापाऱ्यानेच पाच लाख रुपयांच्या लुटीचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या व्यापाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कात्रज चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्या बॅगेतील पाच लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार रविवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तपासाअंती ज्या व्यापाऱ्याने तक्रार दिली होती, त्यानेच इतर दोन साथीदाराच्या मदतीने लुटल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.

कल्याणसिंह ज्ञानसिंग राजपुरोहित (वय-29,रा. खेडशिवापूर) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्यासह अर्जुन बंजारा (वय-35, रा. खेडशिवापूर), प्रकाश राजपुरोहित (वय-23,रा.दत्तनगर आंबेगाव) यांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून चोरीची पाच लाखांची रोकड देखील जप्त केली आहे. कल्याणसिंहवर दोन ते तीन लाखांचे कर्ज होते. यामुळे त्याने अपहार करण्याच्या दृष्टीने बनाव रचला होता. यातील प्रकाशचे मिठाईचे दुकान तर अर्जुन हा कल्याणसिंहकडेच कामाला आहे.

मिरचीपूड टाकूनही डोळे नव्हते लाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर येथे कल्याणसिंह राजपुरोहित याचे मिठाईचे दुकान आहे. मागील काही दिवसांपासून त्याचा व्यावसाय मंदीत होता. दुकानाला तीस हजार रुपये भाडे असून, ते भरण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. कल्याणसिंह काही कामानिमित्त पुण्यात निघाला होता. त्यावेळी शेजारचे किरणा दुकानदार रमेश चौधरी यांनी कल्याणसिंहला दोन व्यापाऱ्यांना देण्यासाठी रक्कम दिली. कल्याणसिंह याने नवले ब्रीज येथे कोथरूडच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर कोंढव्याचे व्यापारी प्रकाश पाटील यांना 5 लाख रुपये देण्यासाठी जात असताना कात्रज चौकातील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर ते आले असताना समोरुन दोन दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी डोळ्यांत मिरची पुड टाकून त्याच्यांकडील 5 लाख रुपये लुटून ते चोरटे कात्रज कोंढवा रोडला पळून गेल्याची खबर कल्याणसिंह यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जेव्हा ही माहिती कल्याणसिंह पोलिसांना सांगत होता त्याच वेळी पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. तसेच मिरचीपूड टाकल्यामुळे त्याचे डोळेदेखील लाल झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा त्यानेच गुन्ह्ययाची कबुली दिली. ही कामगिरी, वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी श्रीधर पाटील, कृष्णा बढे, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव संकपाळ, सचिन पवार, सर्फराज देशमुख, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, अमोल तांबे, गणेश चिंचकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)