डोळे दिपवणाऱ्या इव्हेंट्‌च्या दिव्याखाली काळाकुट्ट अंधार

सचिन सावंत यांची टीका : गुंतवणुकीबाबत राज्य सरकार व भाजपने केलेले दावे खोटे
मुंबई – व्यवसायासाठी सुलभ राज्यांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 10 राज्यांतही स्थान मिळवू शकला नाही. आघाडी सरकारच्या काळात अग्रेसर असणारा महाराष्ट्र भाजप शिवसेना सरकारच्या काळात 13 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे गुंतवणुकीबाबत राज्य सरकार व भाजपने केलेले खोटारडे दावे उताणे पडले आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.

मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र सारखे मोठे मोठ्या डोळे दिपवणाऱ्या इव्हेंट्‌च्या दिव्याखाली प्रत्यक्षात काळाकुट्ट अंधार असल्याचे जागतिक बॅंकेच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची जाहिरातबाजी आणि इव्हेंटवर केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या उधळपट्टीतून राज्याचे नुकसान आणि जाहिरात व इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे उखळ पांढरे झाले आहे. यातून राज्यातील जनतेच्या हाती काहीही लागले नाही. सरकारने जाहीर केलेले 8 लाख कोटी आणि 16 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आकडे कुठे गेले? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी करावा, अशी मागणी सावंत यांनी केली.

मॅग्नेटीक महाराष्ट्रच्या जाहिरातीचे फलक अद्याप खाली उतरलेले नसताना व्यवसाय सुलभते संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अहवालामुळे सरकारच्या इज ऑफ डुंईग बिझनेसचा बनावट मुखवटा ही गळून पडला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, हरयाणा, झारखंड, छत्तीसगड या राज्याची कामगिरी महाराष्ट्रापेक्षा सरस राहिली आहे. यासंदर्भात कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्य उद्योग आणि गुंतवणुकीत पिछाडीवर गेल्याचे वास्तव दाखवले होते, ते सत्य आहे यावर या अहवालाने शिक्कामोर्तब झाले आहे, असे सावंत म्हणाले.

राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी देशातील 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुंतवणुक राज्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सरकारचा खोटेपणा उघड करून महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीत पिछाडीवर गेला आहे, हे दाखवले होते.

कॉंग्रेसच्या आरोपांना खोटे ठरविण्याकरता मी महाराष्ट्र हितेषी आहे की महाराष्ट्र द्वेषी आहे? असा प्रश्न भाजप प्रवक्‍त्यांनी मला विचारला होता. खोटी आकडेवारी देऊन भाजपतर्फे आमदार राम कदम आणि सरकारकडून पत्रकारपरिषद घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कॉंग्रेसला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांचाही आता मुखभंग झाला असून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल भाजप आणि सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

सरकार राज्यात गुंतवणूक आणण्यात आणि औद्योगिक विकासात सपशेल अपयशी ठरले आहे, हे वारंवार दिसून आले. पण अतिरंजीत आणि खोटे आकडे देऊन सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करित आहे. या सरकारचा खोटेपणाचा डोलारा आता कोसळला असून महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकासात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)