डोनेटकार्ट : एक अनोखा उपक्रम

मेघना ठक्कर

एखाद्या स्वयंसेवी संस्थेला देणगी देण्यासाठी नेहमीच आवाहन केले जाते. या संस्था मागासलेल्या भागात, उपेक्षित मुलांसाठी, वंचित घटकांसाठी, बेघर, गरीब, भिकारी, अनाथ, पीडितांसाठी काम करत असतात. सरकारी पातळीवर मिळणारी मदत तुटपूंजी असते. त्यामुळे सार्वजनिक पातळीवरून देणगीस्वरूपात निधी गोळा करून त्याचा विनियोग गरजूंपर्यंत केला जातो. परंतु काही देणगीदार स्वयंसेवी संस्थांच्या कामाबाबत शंका उपस्थित करतात. आपण दिलेली देणगी गरजूंपर्यंत पोचेल की नाही याबाबत त्यांना हमी नसते. त्यामुळे कधी कधी ते देणगी देण्यास नकार देतात किंवा टाळाटाळ करतात. परिणामी प्रामाणिक स्वयंसेवी संस्थांना या वर्तनाचा फटका बसतो. त्यामुळे अशा प्रकारचा प्रसंग उदभवू नये यासाठी दोन तरुण अभियंत्यांनी देणगीदारांसाठी एक व्यासपीठ तयार केले असून ती देणगी योग्यरितीने आणि पारदर्शकपणे गरजूंपर्यंत कशी जाईल याची माहिती देणगीदारांपर्यत दिली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

21 वर्षाच्या दोन अभियंत्यांनी ई-कॉमर्सप्रमाणे डोनेटकार्ट नावाचे एक व्यासपीठ विकसित केले आहे. नियमित देणगी स्वीकारण्यापेक्षा गरजेच्या वेळीच देणगी स्वीकारण्याची पद्धत डोनेटकार्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. स्वयंसेवी संस्थांनी क्राऊडफंडिंगचे अभियान डोनेटकार्टवर सुरू केले आणि त्यास प्रतिसादही मिळू लागला. एखाद्या अनाथ मुलांला शैक्षणिक साहित्य किंवा तत्सम साहित्य हवे असेल तर त्याच्याकडे पैसे असणे गरजेचे आहे. परंतु या ई-कॉमर्सने देशातील सर्व विक्रेत्यांशी करार केलेला असल्याने सर्वप्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. संबंधित वस्तूची किंमत बाजारमूल्यापेक्षा कितीतरी कमी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्या वस्तू संकेतस्थळावरही पाहावयास मिळतात. त्यानुसार एखादा देणगीदार अशा शैक्षणिक वस्तू पाहून त्या खरेदी करून गरजूंपर्यंत पोचवू शकतात. अशा प्रकारे डोनेटकार्टचे अभियान संपल्यानंतर विकत घेतलेले उत्पादन किंवा वस्तू संबंधित संस्थेपर्यंत पोचवण्याचे काम करतात. एखादा बडा देणगीदार मोठ्या प्रमाणात ऑनलाईन वस्तू खरेदी करतो आणि त्या वस्तू संस्थेला पोचवण्याची जबाबदारी डोनेटकार्ट पार पाडते. त्यामुळे आपल्या निधीचा अपव्यय होण्याची सूतराम शक्‍यता राहत नाही.

सहा जणांनी डोनेटकार्टची सुरवात केली होती आणि आज तो मोठा व्यवसाय म्हणून नावारूपास आला आहे. कॉलेजजीवनापासूनच सामाजिक कार्यात आघाडीवर असलेला संदीप शर्मा हा डोनेटकार्टचा महत्त्वाचा घटक आहे. डोनेटकार्टच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवी संस्थांपर्यंत मदत पोचल्याचे सांगत क्राऊडफंडिंगमुळे संस्थांचा निधी जमवण्यासाठी लागणारा मोठा वेळ वाचला असल्याचे शर्मा सांगतात. संदीपने नोकरी सोडल्यानंतर सतत तीन महिने डोनेटकार्टवर काम केले आहे. त्याचा सहकारी अनिल कुमार रेड्डी हा देखील डोनेटकार्टमध्ये सक्रिय आहे. डोनेटकार्ट ही संपूर्णपणे मोफत सेवा असून कोणीही आणि केव्हाही अभियान सुरू करू शकते. गरजूंपर्यंत वस्तू पोचवण्याचे काम अगदी मोफतपणे केले जाते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संदीप सांगतात. डोनेटकार्टमुळे गरजूपर्यंत वस्तू किंवा निधी पोचण्याची हमी देणगीदारांना मिळाली आहे. क्राऊडफंडिंगच्या सुविधेमुळे स्वयंसेवी संस्थांना संबंधितांच्या गरजा भागवण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी झाली आहे.

एकाच व्यासपीठावर देशातील व्यवसायिक आणि देणगीदार आल्याने मागणी तसा पुरवठा होऊ लागला आहे. स्वयंसेवी संस्थांची मागणी, देणगीदाराची खरेदी आणि डोनेटकार्टची सेवा यामुळे एनजीओच्या कामात पारदर्शकता आणि वेग आला आहे. भारतात तीस हजाराहून अधिक एनजीओ संस्था विविध ठिकाणी काम करताना दिसून येतात. काहींना मुबलक निधी मिळतो तर काहींना निधी जमवण्यासाठी बराच आटापिटा करावा लागतो. डोनेटकार्टमुळे मात्र काही प्रमाणात एनजीओच्या निधींची कमतरता भरून निघण्यास हातभार लागला आहे आणि देणगीदारांनाही गरजूपर्यंत आपला निधी पोचल्याचे समाधान मिळत आहे, हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)