‘डोकेवाडा’ने ओलांडली धोक्‍याची पातळी; ‘बिंदुसरा’ही काठोकाठ

बीड – दोन दिवसांपूर्वीच्या संततधार पावसानंतर रविवारी तालुक्‍यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कर्झणी तलाव ओव्हरफ्लो झाला असून डोकेवाडानेही धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. दोन्ही तलावातील पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने बिंदुसरा धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.

दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात पावसाचे कमबॅक झाले. संततधार पावसामुळे नद्या-नाले खळखळू वाहिले. रविवारी तालुक्‍यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे कर्झणी तलावातील पाण्याचा बिंदुसरा धरणात विसर्ग झाला आहे. दुसरीकडे डोकेवाडा तलाव देखील ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. डोकेवाडाचे पाणीही बिंदुसरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणातील साठा वाढत असून नदी ओसंडून वाहू लागली आहे. पाण्याचा प्रवाह वाढत गेल्यास चादरीवरुन पाणी वाहू शकते. त्यानंतर बिंदुसरेचे पाणी नदीचेपात्र सोडू शकते असा अशी शक्‍यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगावी- आ. क्षीरसागर
बिंदुसरा नदीतील पाण्याच्या वाढत्या प्रवाहाच्या अनुषंगाने आ. जयदत्त क्षीरसागर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बीड, मांजरसुंबा व पाली परिसररात अतिवृष्टी झाल्याने बीड शहरातून जात असलेल्या बिंदुसरा नदीचे पाणी वाढत आहे. शहरातील खासबाग, जुना बाजार,कंकालेश्वर मंदिर, चांदणी चौक, जुना मोंढा, डॉ. आंबेडकर चौक या भागातील नागरिकांना त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)