डोकलाम प्रकरणातून भारताने शिकायला हवे – चीन

चीनच्या इशाराने पुन्हा वाद चिघळण्याची शक्‍यता

बिजिंग – चीन आणि भारत या दोन्ही देशांनी आपले सैन्य डोकलाममधून मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यामुळे हा तणाव निवळेल असे वाटत असतानाच दुसऱ्या दिवशीच डोकलाम प्रकरणावरून धडा घ्या, असे चीनने भारताला सुनावले आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चीनने दिलेल्या नव्या इशाऱ्यामुळे हा संघर्ष आणखी काही काळातही सुरू राहण्याची शक्‍यता आहे.

एका संकेतस्थळावर दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलाम प्रश्नावरून सुमारे 70 दिवस वाद सुरू होता. सोमवारी दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. अशात पुन्हा एकदा चीनने भारताला इशारा दिला आहे. सिक्कीममधील डोकलाम सीमाभागात चीनच्या सैन्याने जून महिन्यात घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्यदलानेही डोकलाममध्ये सैन्य उभे केले होते. आधी चीनने सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका भारताने घेतली होती, तर भारताने आधी सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका चीनने घेतली होती.

भारताने सैन्य मागे घेतले नाही तर युद्धाला तयार राहावे, 1962 सारखी अवस्था करू’ असे इशारे देण्यात आले होते. या इशाऱ्यांना भारताने चोख प्रत्युतर दिले. तसेच अत्यंत संयमी भूमिका घेऊन हा प्रश्न हाताळला. अशात या डोकलाम प्रकरणातून भारताने शिकायला हवे, सीमा प्रश्नाबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याचे अधिक काटेकोरपणे पालन करावे, असेही चीनने म्हटले आहे. डोकलाममधून चीनने बुलडोझर आणि रस्ते निर्मितीची साधने हटवली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डोकलामच्या निर्णयावरून चीनने वादग्रस्त भागात रस्ता निर्मितीचा निर्णय मागे घेतला असल्याचे स्पष्ट होते, अशीही माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)